संपूर्ण देशात आज नाताळचा सण साजरा केला जात आहे. भारतातही नाताळानिमित्त उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, या सणाला काही संघटनांकडून विरोध करण्यात येत आहे. दरम्यान, मध्य प्रदेशातील विश्व हिंदू परिषदेने शाळांना ‘सनातन हिंदू’ विद्यार्थ्यांना पालकांच्या परवानगीशिवाय सांताक्लॉजची वेशभूषा करण्यास आणि ख्रिसमस ट्री आणण्यास सांगू नये, असे म्हटले आहे.
हेही वाचा – सांताक्लॉज बनून चॉकलेट वाटप करणाऱ्याला गुजरातमध्ये स्थानिकांकडून मारहाण; पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं प्रकरण
विश्व हिंदू परिषदेने शनिवारी भोपाळमधील सर्व शाळांना पत्र लिहिले आहे. या पत्रात कोणत्याही शाळेने हिंदू विद्यार्थांना त्यांच्या पालकांच्या परवानगीशिवाय वेशभूषा करण्यास आणि ख्रिसमस ट्री आणण्यास सांगू नये, असं म्हटले आहे. तसेच हा प्रकार हिंदू संस्कृतीच्या विरोधात असून हे हिंदू धर्मातील विद्यार्थ्यांना ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित करण्याचे षडयंत्र आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – धर्मांतराचा आरोप करत नाताळच्या कार्यक्रमावर ३० युवकांचा हल्ला; चर्चच्या प्रमुखासह सहा जणांना अटक
विश्व हिंदू परिषदेने मिशनरी नसलेल्या शाळांमध्ये ‘ख्रिसमस डे’ साजरा करण्यावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. “हिंदू मुलांना सांता बनवून शाळा ख्रिश्चन धर्माचा प्रचार करत आहे. आमच्या हिंदू मुलांना राम बनू द्या, कृष्ण बनू द्या, बुद्ध होऊ द्या, महावीर होऊ द्या, गुरु गोविंद सिंग होऊ द्या, पण सांता होऊ देऊ नका”, असे ते म्हणाले. तसेच शाळा विद्यार्थ्यांना सांताक्लॉजची वेशभूषा करण्याचा आग्रह करत असेल, तर अशा शाळांविरोधात विश्व हिंदू परिषद कायदेशीर कारवाई करेल, अशा इशाराही या पत्रातून देण्यात आला आहे.