विधानसभांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पत्कराव्या लागलेल्या पराभवाचे खापर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरच फोडू नये तर तो सामूहिक पराभव आहे आणि पक्ष त्याबाबत आत्मचिंतन करील, असे केंद्रीय मंत्री जयंती नटराजन यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्ष हा एकखांबी तंबू नाही त्यामुळे हा सामूहिक पराभव आहे. पक्षाच्या दारुण पराभवाचे खापर एकटय़ा राहुल गांधी यांच्यावर फोडू नये, असेही नटराजन यांनी सूचित केले. आमच्या पराभवाच्या कारणांचे आत्मचिंतन करण्यात येईल, आमचे कोठे चुकले त्याबाबतही आत्मपरीक्षण केले जाईल, असे त्या म्हणाल्या.काँग्रेसने १९९८-९९ मध्ये राज्यातील निवडणुका जिंकल्या होत्या, मात्र लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. त्याचप्रमाणे २००३ मध्ये भाजपने राज्यातील निवडणुका जिंकल्या, मात्र त्यांना लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला, असेही नटराजन म्हणाल्या.मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपची आगेकूच सुरू असताना आणि दिल्लीत सत्ता काबीज केल्यानंतर नटराजन यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

Story img Loader