माजी क्रिकेटपटू आणि आम आदमी पक्षाचे खासदार हरभजन सिंग यांनी शनिवारी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबाबत स्वतःची भूमिका मांडली. इंडिया आघाडीतील अनेक पक्षांनी राम मंदिर सोहळ्याला जाणार नसल्याचे सांगितले आहे. आम आदमी पक्षानेही राम मंदिराच्या उदघाटन सोहळ्याला उपस्थित न राहता दिल्लीतील सर्व विधानसभा मतदारसंघात सुंदरकांड पाठ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र खासदार हरभजन सिंग यांनी स्वपक्षाच्या विरोधात जाऊन भूमिका घेतली आहे. “कुणी काहीही ठरविले असले तरी मी राम मंदिराच्या सोहळ्यासाठी जाणार”, असे सिंग यांनी जाहीर केले.
“प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी कोण जाणार आणि कोण जाणार नाही, हे महत्त्वाचे नाही. काँग्रेस किंवा इतर पक्ष जाणार आहेत की नाही, हे मला माहीत नाही. पण मी नक्कीच जाणार आहे. दैवावर माझी श्रद्धा असल्यामुळे ही माझी वैयक्तिक भूमिका आहे. जर माझ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाण्यामुळे कुणाला काही अडचण वाटत असेल तर त्यांना त्यांचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे”, अशी रोखठोक भूमिका हरभजन सिंग यांनी मांडली.
“आपले सुदैव आहे की, यावेळी राम मंदिराचे निर्माण झाले आहे. तर आपण त्याठिकाणी जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले पाहीजे. मी तर नक्की रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहे”, असेही हरभजन सिंग यांनी सांगितले.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी २२ जानेवारी रोजी होत असलेल्या सोहळ्याला जाणार नसल्याची भूमिका व्यक्त केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हरभजन सिंग यांनी यावर भाष्य केले. केजरीवाल यांना औपचारिक निमंत्रण मिळालेले नाही, असे सांगून केजरीवाल यांनी या सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले. २२ जानेवारी नंतर पत्नी, मुले आणि इतर कुटुंबियांसह अयोध्येत प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी जाणार असल्याचेही केजरीवाल यांनी जाहीर केले आहे.