देशावासियांचं तब्बल ५०० वर्षांचं स्वप्न सोमवारी (२२ जानेवारी) पूर्ण झालं आणि रामलल्ला अयोध्येतील मंदिरात विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री रामाच्या मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सोमवारी या सोहळ्यासाठी मंदिरात उपस्थित असलेल्या दिग्गजांनी रामलल्लांचं दर्शन घेतलं. त्यानंतर आता हे मंदिर सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात आलं आहे. आज पहाटेपासूनच रामभक्तांनी श्री राम मंदिरात दर्शनासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, अयोध्येत भाविकांची इतकी मोठी गर्दी झाली आहे की, पोलिसांनी भाविकांना अयोध्येत न येण्याचं आवाहन केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सकाळपासून भाविकांमध्ये धक्काबुक्कीच्या अनेक घटना झाल्या आहेत. अशा परिस्थितीत बाराबांकी पोलिसांनी अयोध्येत येणाऱ्या भाविकांना विनंती केली आहे की, काही वेळ थांबा, सध्या अयोध्येला येऊ नका. दरम्यान, अयोध्येत लोटलेला जनसागर पाहून पोलिसांनी अनेक ठिकाणी रस्ते वळवले आहेत. अनेक भागांमध्ये मोठी वाहतूक कोंडीदेखील झाली आहे. सकाळी पोलिसांनी बॅरिकेट्स हटवल्यानंतर भक्तांनी मंदिराच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर गर्दी इतकी वाढत गेली की, पोलीस आता मर्यादित संख्येने आणि टप्प्याटप्याने भाविकांना मंदिर परिसरात सोडत आहेत.

श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या २ आठवडे आधी अयोध्येतील सर्व हॉटेल्समध्ये ८० टक्के बुकिंग्स झाले आहेत. येथील हॉटेलांमध्ये एक दिवस राहण्यासाठी पाच टक्के अधिक पैसे द्यावे लागत आहेत. काही आलिशान खोल्यांच्या किंमती १ लाखांपर्यंत गेल्या आहेत.

मंदिराबाहेर भक्तांची इतकी गर्दी जमली आहे की, अनेक ठिकाणी डिव्हाईडर तुटले आहेत, बेरिकेट्स मोडले आहेत. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ लागली आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी अधिक पोलीस कुमक अयोध्येत बोलावण्यात आली आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक सुजीत पांडेय यांनादेखील सकाळी अयोध्येत यावं लागलं. पांडेय म्हणाले, सध्या परिस्थिती आमच्या नियंत्रणात आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी अधिक पोलीसफाटा तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान बाराबांकी पोलिसांनी भाविकांना आवाहन केलं आहे की, सध्याची गर्दी पाहता भाविकांनी आज अयोध्येला येऊ नये. गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी अयोध्येतील अनेक मार्ग वळवण्यात आले आहेत. आता गर्दी कमी झाल्यानंतरच मार्ग पुन्हा होते तसे केले जातील.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont come to ayodhya today barabanki police appeal to ram devotees asc
Show comments