Goa Tourism: गोवा, हे अनेक वर्षांपासून विदेशी पर्यटकांना भारतात येण्यासाठी आकर्षित करत आहे. मात्र कोविड काळानंतर गोव्यातील परदेशी पर्यटकांची संख्या घटू लागली आहे. गोव्यात हॉटेल परवडत नाहीत, टॅक्सीची सुविधाही महागली असल्याच्या तक्रारी पर्यटक करत आहेत. तसेच गोव्यापेक्षा श्रीलंकेला प्राधान्य दिले जात असल्याच्या काही पोस्ट सोशल मीडियावर लिहिल्या जात आहेत. यावर आता गोव्याच्या पर्यटन विभागाने उत्तर दिले आहे. भारतातील एखाद्या राज्याची तुलना श्रीलंकेसारख्या देशाशी करणे अत्यंत चुकीचे आहे, असे गोवा पर्यटन विभागाने म्हटले आहे. यातून गोव्याबद्दल चुकीचा दृष्टीकोन मांडला जात आहे, असेही विभागाने म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोव्याच्या पर्यटन व्यवस्थेतील त्रुटी काही जणांनी दाखवून दिल्यानंतर पर्यटन विभागाने त्याची दखल घेतली आहे. पर्यटन विभागाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, गोवा हे भारतातील राज्य आहे. त्यामुळे त्याची तुलना शेजारी देशांशी करणे चुकीचे आहे. गोव्यासमोर नक्कीच काही अडचणी आहेत. गोव्यात आंतरराष्ट्रीय स्तरवरून येणाऱ्या विमानांची संख्या कमी आहे. ही कमतरता दूर व्हावी, यासाठी आम्ही केंद्र सरकारशी वारंवार चर्चा करत आहोत. जर गोव्याला आंतरराष्ट्रीय फेऱ्या वाढवून मिळाल्या तर याचा नक्कीच पर्यटनाला लाभ होईल.

गोवा हे जगातील इतर शहरांप्रमाणेच असून इथले पर्यटन बाजारावर अवलंबून आहे. जर हॉटेल आणि हवाई प्रवास महागला तर पर्यटनासाठी अधिक पैसे खर्च करावे लागतात. त्यामुळे पर्यटक इतर पर्याय शोधतात. त्यामुळे गोवा पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नेहमीच आव्हानांचा सामना करत आला आहे. जगातील काही मोठे हॉटेल्स आता गोव्यात येऊ इच्छितात. अनेक हॉटेल्सचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यामुळे गोव्यात पुन्हा एकदा पर्यटन क्षेत्र उभारी घेईल.

हे वाचा >> मुंबई गोवा महामार्ग येत्या डिसेंबरमध्ये पुर्ण होणार, उद्योगमंत्री उदय सामंत

गोव्यात टॅक्सी माफियाचा छळ

गोव्याऐवजी अनेक विदेशी पर्यटक आता श्रीलंका, थायलंड आणि व्हिएतनामकडे वळत आहेत, अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्यानंतर गोव्याच्या पर्यटन विभागाने यावर प्रतिक्रिया दिली. गोव्यात टॅक्सी माफियाची दादागिरी वाढली असून त्यांच्याकडून पर्यटकांचा छळ केला जात असल्याची बाब अनेकांनी उपस्थित केली. तसेच हॉटेल व्यावसायिकांनी हॉटेलमध्ये निवासासाठी गरजेपेक्षा अधिक पैसे आकारण्यास सुरुवात केल्याचीही तक्रार अनेकजण करत आहेत.

गोव्याच्या पर्यटन विभागाने मागच्या वर्षी सादर केलेल्या आकडेवारीनुसार, २०२० साली कोविड काळात केवळ ३.०३ लाख विदेशी पर्यटक गोव्यात आले होते. तर दुसऱ्या वर्षी २०२१ साली कोविडच्या दुसऱ्या लाटेत केवळ २२ हजार विदेशी पर्यटकांनी गोव्याला भेट दिली होती. तर २०२२ साली हा आकडा वाढून १.७५ लाख पर्यटक गोव्यात आले. सध्या कोविड काळापूर्वी असलेला विदेशी पर्यटकांचा आकडा गोव्याला गाठता आलेला नाही.

विदेशी पर्यटक घटले असले तरी देशी पर्यटक मात्र मोठ्या संख्येने गोव्यात येत आहेत. २०२२ साली देशांतर्गत राज्यातील ७० लाख पर्यटक गोव्यात आले होते. २०१८ साली ७०.८ लाख पर्यटक गोव्यात आले होते. त्यापेक्षा हा आकडा किंचित थोडा कमी आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont compare an indian state to country like sri lanka says goa tourism dept to travellers kvg