बीजगणित व पायथागोरसच्या सिद्धांताचा शोध भारतात लागला पण इतरांनी त्याचे श्रेय घेतले या केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी केलेल्या वक्तव्यास काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी पाठिंबा दिला आहे.
प्राचीन भारतीय विज्ञानातील काही खरोखरच्या कामगिरीकडे केवळ हिंदुत्व ब्रिगेडच्या अतिरेकामुळे दुर्लक्ष करणे योग्य नाही असे थरूर यांनी म्हटले आहे.
थरूर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, आधुनिक विचारसरणीचे लोक हर्षवर्धन यांच्यावर टीका करीत आहेत पण हर्षवर्धन यांनी केलेले वक्तव्य योग्यच आहे. हिंदुत्व ब्रिगेडवर टीका करताना भारतीय प्राचीन विज्ञानाच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. आपण याबाबत अनेक लेख यापूर्वी लिहिले आहेत. मॉडर्निस्ट स्निअरिंग अॅट हर्षवर्धन यावर त्यांनी म्हटले आहे की, गणेशा प्लास्टिक सर्जरी सिद्धांत योग्य नसला तरी सुश्रुताने जगातील पहिली शस्त्रक्रिया केली हे खरे आहे.
केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन यांनी सायन्स काँग्रेसमध्ये असे सांगितले होते की, प्राचीन भारतीय वैज्ञानिकांनी इतर देशातील लोकांना आपल्या शोधांचे श्रेय घेऊ दिले. पायथागोरस सिद्धांत हा आपण शोधलेला होता पण त्याचे श्रेय ग्रीकांना गेले. बीजगणित अरबांच्या आधी आपल्याला माहिती होते पण त्याला आपण अलजिब्रा म्हणतो. भारतीय वैज्ञानिकांनी विज्ञानाचा वापर कधीही नकारात्मक बाबींसाठी केला नाही. सौरमाला, वैद्यक विज्ञान, रसायनशास्त्र व पृथ्वी विज्ञानात आपण आपले ज्ञान निस्वार्थीपणे जगाबरोबर वाटले होते.
इतर देशांप्रमाणे आपल्या देशातील वैज्ञानिकांनाही प्राचीन काळातील शोधांचे श्रेय घेऊ द्यावे, असे विधान केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन यांनी सायन्स काँग्रेसमध्ये केले होते. त्याला काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी दुजोरा दिला.