शनिवारी सकाळी गाझा पट्टीतील दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर रॉकेट हल्ला केला आहे. या हल्ल्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, हमासच्या दहशतवाद्यांकडून महिलांवर कौर्याची परिसीमा गाठणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पीडित महिला जीवाच्या आकांताने सुटकेसाठी विनवणी करत आहेत. मात्र, हमासचे दहशतवादी अमानुष अत्याचार करताना दिसत आहेत.
दरम्यान, इस्रायलची २५ वर्षीय विद्यार्थिनी नोआ अर्गामनीचं हमासच्या दहशतवाद्यांनी अपहरण केलं आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये हमासचे दहशतवादी पीडितेला एका दुचाकीवरून अपहरण करून घेऊन जाताना दिसत आहेत. तर पीडित तरुणी जीवाच्या आकांताने ओरडत आहे. “मला मारू नका” अशी विनवणी ती करत आहे.
‘न्यूयॉर्क पोस्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार, नोआ अर्गामनी ही ज्यू सण (सुकोट) साजरा करण्यासाठी गाझा पट्टीजवळील एका रेव्हमध्ये सहभागी झाली होती. इथे ती ट्रान्स म्युझिक महोत्सवाचा आनंद घेत होती. यावेळी हमास दहशतवाद्यांनी गर्दीवर गोळीबार करत रॉकेट हल्ला केला. यावेळी जमावाने रस्ता दिसेल तिकडे पळायला सुरुवात केली. या गोंधळात पीडित नोआ हमास दहशतवाद्यांच्या हाती लागली. तिचा प्रियकर अवि नॅथन याचंही पॅलिस्टिनी दहशतवाद्यांनी अपहरण केलं.
व्हायरल व्हिडीओमध्ये हमासचे दहशतवादी नोआचं अपहरण करून घेऊन जाताना दिसत आहेत. तर नोआ अर्गमनी ओरडताना दिसत आहे. “मला मारू नका! नाही, नाही, नाही,” असं ती म्हणत आहे. तर तिचा प्रियकर अवि नॅथनलाही दहशतवाद्यांनी ताब्यात घेतल्याचं दिसत आहे. या क्रूर अपहरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.