तामिळनाडूचे ऊर्जामंत्री सेंथिल बालाजी यांना अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) अटक केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने कारवाई केली आहे. सेंथिल बालाजी यांना केलेली अटक ही सूडबुद्धीने केली आहे, असं मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी म्हटलं. द्रमुकला डिवचण्याचा प्रयत्न करू नका, अशा इशाराही मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी दिला आहे.
“आम्हाला आणि द्रमूकच्या कार्यकर्त्यांना भडकावण्याचा प्रयत्न करू नका. ही धमकी नसून इशारा आहे. १० वर्षांपूर्वी दिलेल्या तक्रारीवरून सेंथिल बालाजी यांना अटक करण्याची गरज काय होती,” असा सवाल स्टॅलिन यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा : “भाजपाचा नवा नारा, बेटी डराओ-ब्रिजभूषण…,’” काँग्रेसचा हल्लाबोल; अनुराग ठाकूरांना विचारले सवाल!
“पाचवेळा आमदार आणि दोनदा मंत्री असलेल्या सेंथिल बालाजी यांना अटक करून दहशतवाद्यासारखं प्रश्न कशाला विचारता? तपासाला सहकार्य करणार असल्याचं बालाजी यांनी सांगितलं होतं. तरीही ईडीने त्यांच्यावर दबाव टाकला. त्यानंतर बालाजी यांच्या छातीत दुखू लागले आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं,” असं स्टॅलिन यांनी म्हटलं.
हेही वाचा : भाजपाने आणलेला धर्मांतर विरोधी कायदा काँग्रेसने केला रद्द; सावरकरांचा धडाही अभ्यासक्रमातून वगळला
“विरोधकांना धमकावण्याचं काम भाजपाकडून करण्यात येत आहे. शिवसेना विरोधात गेल्यावर संजय राऊतांना अटक करण्यात आली. आपने विरोध केल्यावर मनिष सिसोदियांना अटक केली. राष्ट्रीय जनता दल विरोधात गेल्यावर तेजस्वी यादव यांच्या विविध ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली,” असंही स्टॅलिन म्हणाले.