सट्टेबाजीच्या रॅकेटवरून जावई गुरुनाथ मयप्पन यांना मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन राजीनामा देण्याच्या विचारात होते. मात्र, पश्चिम बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनीच श्रीनिवासन यांना राजीनामा न देण्याचा सल्ला दिला.
आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी श्रीनिवासन शनिवारी दुपारी कोलकात्याला पोहोचले. त्याचदिवशी रात्री जेवणावेळी दालमिया यांनी श्रीनिवासन यांच्याशी चर्चा करून त्यांना राजीनामा न देण्याचा सल्ला दिला. श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी बाहेरील व्यक्तींकडून करण्यात येते आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि त्याच्या संलग्न संघटनांमधील कोणीही श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही, हे दालमिया यांनी श्रीनिवासन यांच्या लक्षात आणून दिले. त्यानंतर श्रीनिवासन यांनी राजीनामा देण्याचा विचार पूर्णपणे बाजूला ठेवला. माझ्यावर कोणीही राजीनामा देण्यासाठी दबाव आणू शकत नाही, असे त्यांनी रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ठामपणे सांगितले.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ संपूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिल, असे आश्वासन दालमिया यांनीच श्रीनिवासन यांना दिले. दिल्लीतील एका दिग्गज घराण्यातील जावयावरील गंभीर आरोपांचे काहीही झाले नाही. तर माझ्या जावयावरील आरोपांबाबत स्थिती खूपच बरी आहे, असेही श्रीनिवासन यांनी यावेळी सांगितल्याचे समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा