शेतकऱ्यांसाठी काँग्रेसने मगरीचे अश्रू ढाळणे बंद करावे असं म्हणत केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. शुक्रवारी पियूष गोयल यांनी अर्थसंकल्प मांडला त्यामध्ये अल्प भूधारक शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकरापेक्षा कमी जमीन आहे त्यांना मासिक 500 रुपये देणार असल्याचीही घोषणा केली. यानंतर काँग्रेसने टीका करत केंद्र सरकारने शेतकऱ्याला दिवसाला 17 रुपये देऊन त्याचा अपमान केला आहे असे म्हटले होते. यानंतर आता अरूण जेटली यांनी काँग्रेसवर निशाणा साधत तुम्ही मगरीचे अश्रू ढाळू नका असे म्हटले आहे.

अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या तरतुदींचा फायदा देशातल्या 12 कोटी शेतकऱ्यांना होणार आहे. आम्ही देशाचा विकास कसा होईल, शेतकरी स्वयंपूर्ण कसा होईल, देशात रोजगार कसे निर्माण होतील याकडे लक्ष केंद्रीत करतो आहोत. मात्र काँग्रेस पक्षाला हे काही नको आहे, इतक्या वर्षात त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीही केले नाही. आम्ही शेतकरी स्वयंपूर्ण कसा होईल यावर भर देतो आहोत मात्र काँग्रेसला ते दिसत नाही ते टीका करण्यातच धन्यता मानतात. मात्र शेतकऱ्यांसाठी काँग्रेसला वाटत असलेलं दुःख बेगडी आहे त्याला काहीही अर्थ नाही, मगरीचे अश्रू ढाळण्यासारखं आहे असं म्हणत जेटली यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

अर्थसंकल्प सादर झाल्यापासून या अर्थसंकल्पावर काँग्रेसकडून आणि इतर विरोधी पक्षांकडून सातत्याने टीका होते आहे. सरकारने लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकप्रिय घोषणांचा अर्थसंकल्प सादर केला अशी टीका होते आहे, अशात आता अरूण जेटलींनी काँग्रेसवर टीका केली आहे.

10 वर्ष यूपीएची सत्ता होती त्यावेळी शेतकऱ्यांसाठी यूपीएने आणि काँग्रेसने काय केले? 52 हजार कोटींची कर्जमाफी दिल्याचे यूपीए सरकारने जाहीर केले होते. प्रत्यक्षात हे पैसे शेतकऱ्यांना न मिळता व्यापाऱ्यांच्या हाती गेले. या गोष्टी देशातला शेतकरी विसरलेला नाही, मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या विकासासाठी आणि एकंदरीतच देशाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. मात्र शेतकऱ्यांसाठी खोटी सहानुभुती बाळगणाऱ्या काँग्रेसला हे कळणार नाही असेही जेटली यांनी म्हटले आहे.

 

Story img Loader