राजकारण्यांनी केलेली बेताल आणि उथळ वक्तव्ये चॅनलवर दाखवू नका आणि वृ्त्तपत्रातही छापू नका, असा सल्ला पश्चिम बंगालमधील एका मंत्र्याने माध्यमांना दिला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निकटचे असलेले राज्याचे उद्योगमंत्री पार्थ चॅटर्जी यांनी हा सल्ला दिला.
राजकारण्यांनी केलेल्या बेताल वक्तव्यांना माध्यमांनी प्रसिद्धी दिल्यामुळे त्यांना आणखी चेव येतो. माध्यमांनी राजकाऱण्यांना सातत्याने प्रसिद्ध दिल्याने ते परस्परांशी स्पर्धा करू लागतात, असे निरीक्षण चॅटर्जी यांनी नोंदविले.
पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये सत्ताधारी आणि विरोधक परस्परांवर विखारी आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर चॅटर्जी यांनी वरील सल्ला दिला. तृणमूल कॉग्रेसमधील नेत्यांनीही विरोधकांवर टीका करताना भान राखावे, असे त्यांनी म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी राज्यातील अन्नपुरवठा मंत्री ज्योतिप्रिया मुलीक यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांना विषारी साप असे संबोधले होते. तसेच नागरिक सापांपासून जसे लांब राहतात, तसेच त्यांनी कम्युनिस्ट नेत्यांपासून लांब राहावे, असे म्हटले होते. तृणमूल पक्षाचे खासदार सुवेंदू अधिकारी यांनीही त्यापूर्वी कम्युनिस्ट नेत्यांची सापाशी तुलना केली होती.

Story img Loader