देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. ऑक्सिजन, बेडस, लसीची कमतरता भासत आहे. अशा परिस्थितीतही देशात राजकारण सुरु आहे. काँग्रेसने करोना परिस्थितीवरुन मोदी सरकारवर वारंवार टीका केली होती. त्याला आता भाजपाने प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेसनं करोना संकट काळात अफवा आणि संभ्रम पसरवल्याचा आरोप भाजपानं केला आहे. तसेच देश आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा खराब करण्यासाठी काँग्रेस टूलकिटचा वापर करत असल्याचा आरोप भाजपा नेत्यांनी केला आहे. तर काँग्रेन नेत्यांनी भाजपाचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी देखील हे आरोप फेटाळून लावले आहेत. खोटी माहिती पसरवू नका असे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.
“खोटी माहिती पसरवण्यात वेळ घालवू नका. जागे व्हा आणि लोकांचे जीव वाचवायला सुरुवात करा”, असे ट्विट प्रियांका गांधी यांनी केलं आहे. तसेच हे टूलकीट फेक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. टूलकीटचा फोटो त्यांनी शेअर केला आहे. त्यावर फेक असा उल्लेख करण्यात आला आहे.
Don’t waste time spreading lies, wake up and start saving lives. pic.twitter.com/4v6eQ1zV2m
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) May 18, 2021
भाजपा नेते आणि मंत्र्यांनी काँग्रेसवर टूलकिटचे आरोप करणारे पोस्ट सोशल मीडियावर शेअर केले आहेत. टूलकिटबाबतची पत्रकं भाजपा नेत्यांनी शेअर केली आहेत. यात काँग्रेस कार्यकर्त्यांना ‘Indian Stain’ आणि ‘Modi Strain’ असे शब्द वापरण्याच्या सूचना देण्यात आल्याचं पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. त्यासोबत कुंभ मेळ्यातून करोनाचा प्रसार झाल्याचा उल्लेख करण्यास सांगितल्याचा आरोपही भाजपा नेत्यांनी केला आहे. राहुल गांधी रोज करत असलेलं ट्वीटही टूलकिटचा भाग असल्याचा आरोप भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे. जाणीवपूर्वक कुंभमेळ्यावर कमेंट्स केली गेली आहे. मात्र ईदवर गप्प असल्याचा आरोप भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे.
दरम्यान, काँग्रेसनं भाजपाचे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजीव गौडा यांनीही ट्विटरच्या माध्यमातून भाजपावर टीका केली आहे. तसेच याप्रकरणी भाजपा प्रवक्ते संबित पात्रा आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.