भारतीय उपखंडात शांतता नांदावी, अशी आमची पहिल्यापासून इच्छा आहे. आम्ही आजही पाकिस्तानशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी उत्सुक आहोत. मात्र, त्यांच्याकडून तसे वर्तन अपेक्षित आहे. त्यांनी आमचा मैत्रीचा हात गृहीत धरू नये, असा इशारा भारताचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी शेजारी देशाला दिला. ६४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करताना ते बोलत होते. राष्ट्रपती झाल्यानंतर प्रजासत्ताक दिनानिमित्तचे त्यांचे हे पहिलेच भाषण होते. दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या पाश्र्वभूमीवर निर्माण झालेल्या प्रश्नांचाही त्यांनी आपल्या भाषणात परामर्श घेतला.  
भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक आणि शस्त्रसंधीच्या कराराचा भंग करण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांत कमालीची वाढ झाली आहे. उभय देशांमध्ये मतभेद अथवा तणाव मी समजू शकतो, मात्र भारतात होणाऱ्या दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तानकडून खतपाणी मिळत असेल, तर ती आपल्या सर्वासाठी चिंतेची बाब आहे. पाकिस्तानसोबत आम्हाला आजही मैत्री हवी आहे. मात्र, त्यांच्याकडून सुसंगत वर्तन अपेक्षित आहे. त्यांनी आमची मैत्री गृहीत धरू नये, असे मुखर्जी म्हणाले.
जगभराप्रमाणे आपला देशही झपाटय़ाने बदलत आहे. आपल्या कायद्यांमध्ये या बदलत्या भारताचे प्रतिबिंब उमटत आहे काय, की त्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दिल्लीत ‘त्या’ तरुणीवर झालेला सामूहिक बलात्कार व त्यात झालेले तिचे निधन हे सारेच अत्यंत क्लेशदायक होते. त्या घटनेत केवळ एक जीव गेला नाही तर उद्याचे आशादायी चित्र पाहणाऱ्या तरुणांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. तो बलात्कार केवळ त्या तरुणीवर झाला नाही तर त्या घटनेमुळे भारतमातेच्या आत्म्यावरच घाला घातला गेला. देशातील प्रत्येक महिलेचे पावित्र्य राखले गेले पाहिजे. आपण तेवढे पुढारलेले व सुसंस्कृत आहोत. या घटनेनंतर तरुण पिढीमध्ये अस्वस्थता व असुरक्षिततेची भावना असेल, तर त्यांना दोष कसा द्यायचा, असेही ते म्हणाले. मात्र, यामुळे हातात कायदा घेणेही चुकीचे आहे. आपल्या कायद्यात सुधारणा आवश्यक असतील तर त्या चर्चेद्वारे, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाद्वारे होऊ शकतात. प्रशासन हे नेहमी चांगल्या गोष्टींसाठीच असते, हे सर्वानी ध्यानात ठेवावे, असा सल्लाही त्यांनी आंदोलकांना दिला.  
सध्याच्या काळात भ्रष्टाचाराने नैतिकतेवर मात केली आहे का, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. लोकप्रतिनिधींनी नागरिकांचा विश्वास कायम राखला पाहिजे. तसेच तरुणांची ऊर्जा योग्य दिशेने नेण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे, याकडेही त्यांनी आपल्या संदेशात लक्ष वेधले.

Story img Loader