पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लक्षद्वीप येथील फोटोवरून प्रचंड वाद झाल्यानंतर मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांनी आता नरमाईची भूमिका घेतली आहे. देशाला कर्जातून बाहेर काढण्याकरता मालदीवने भारताकडे याचना केली आहे.
मालदीववर अंदाजे ४०० मिलिअन डॉलर कर्ज आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यापासून चीन समर्थक मालदीवच्या नेत्याने भारताप्रती कठोर भूमिका घेतली आहे आणि काही तासांतच तीन विमानचालन प्लॅटफॉर्मवर कार्यरत असलेल्या भारतीय लष्करी जवानांना १० मेपर्यंत त्यांच्या देशातून परत जाण्याचे आदेश दिले होते.
हेही वाचा >> मोठी बातमी! अरविंद केजरीवाल यांना मद्य गैरव्यवहारप्रकरणी २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी
स्थानिक माध्यमांना दिलेल्या पहिल्या मुलाखतीत, मुइझ्झू म्हणाले की भारताने मालदीवला मदत पुरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि त्यांनी सर्वाधिक प्रकल्प राबवले आहेत. भारत मालदीवचा सर्वात जवळचा मित्र म्हणून कायम राहील. मालदीव न्यूज पोर्टल एडीशन एमव्हीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
मालदीवचे राष्ट्राध्यक्षांनी आदेश दिल्यानंतर या महिन्यात भारतीय लष्करी कर्मचाऱ्यांच्या पहिल्या तुकडीने मालदीव सोडले आहे. त्या नंतर मुइझ्झू यांनी भारताची प्रशंसा केली. १० मेपर्यंत मुइझ्झू यांनी तीन भारतीय विमानचालन प्लॅटफॉर्मचे व्यवस्थापन करणाऱ्या सर्व ८८ लष्करी कर्मचाऱ्यांनी देश सोडावा, असे आदेश दिले होते. भारत गेल्या काही वर्षांपासून दोन हेलिकॉप्टर आणि एक डॉर्नियर विमान वापरून मालदीवमधील लोकांना मानवतावादी आणि वैद्यकीय निर्वासन सेवा देत आहे.
आम्ही भारताकडून खूप मोठी कर्जे घेतली आहेत. म्हणून, आम्ही या कर्जांच्या परतफेडीच्या संरचनेत उदारता शोधण्यासाठी चर्चा करत आहोत. कोणतेही चालू असलेले प्रकल्प थांबवण्याऐवजी वेगाने पुढे जाण्यासाठी, त्यामुळे मला कोणतेही प्रतिकूल परिणाम (मालदीव-भारत संबंधांवर) होण्याचे कारण दिसत नाही, अशीही सारवासारव मुइझ्झू यांनी केली.