Mallikarjun Kharge: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे मंगळवारी राज्यसभेत भावुक झालेले पाहायला मिळाले. भाजपाचे खासदार घनश्याम तिवारी यांनी खरगे यांच्यावर केलेली टिप्पणी त्यांच्या जिव्हारी लागली. खरगे यांचे संपूर्ण कुटुंब राजकारणात सक्रिय आहे, अशी टिप्पणी तिवारी यांनी केली होती. यानंतर खरगे यांनी सभापतींना विनंती करत तिवारी यांची घराणेशाहीवर आधारित टिप्पणी कामकाजातून काढून टाकण्यात यावी, अशी विनंती केली.

सभापती जगदीप धनकड म्हणाले की, तिवारी यांचे म्हणणे तपासून घेतले जाईल. त्यात जर खरगेंच्या विरोधात काही आक्षेपार्ह असेल तर नक्कीच ते विधान कामकाजातून काढून टाकू.

आज राज्यसभेचे कामकाज सुरू असताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तिवारी यांनी काल केलेल्या विधानावर आक्षेप घेतला. तिवारी यांनी खरगेंच्या राजकीय कारकि‍र्दीवर बोलत असताना त्यांचे संपूर्ण कुटुंब राजकारणात सक्रिय असल्याचे म्हटले होते. खरगेंनी या वक्तव्यावर आक्षेप घेतला. तसेच हे वक्तव्य घराणेशाहीचा ठपका ठेवणारे असल्याचे ते म्हणाले.

हे वाचा >> वायनाडमधील दुर्घटनेवरून खडाजंगी! रेड अलर्ट दिल्याचा अमित शाहांचा दावा केरळच्या मुख्यमंत्र्यांनी फेटाळला; म्हणाले…

मला अधिक जगायची इच्छा नाही

खरगे पुढे म्हणाले, “मी राजकारणात येणारा माझ्या कुटुंबातील पहिलाच सदस्य आहे. काँग्रेस पक्षापासून मी कामकाज करण्यास सुरुवात केली. माझे वडील वयाच्या ८५ व्या वर्षी निधन पावले.” यावर सभापती धनकड म्हणाले की, तुम्हाला मोठे आयुष्य लाभो, अशी प्रार्थना करतो. सभापतींच्या या टिप्पणीला उत्तर देताना खरगे यांनी सांगितले, “मला आता अशा वातावरणात अधिक जगायची इच्छा नाही.”

यावेळी खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींवर केलेल्या टिप्पणीचा व्हिडीओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यावरील कॅप्शनमध्ये पंतप्रधान मोदी यांनी लिहिले की, माझ्या तरूण सहकाऱ्याने अतिशय उत्तर भाषण केले असून सर्वांनी ऐकावे. ज्यामध्ये तथ्य आणि विनोदाची योग्य सांगड घालून इंडिया आघाडीच्या राजकारणाला उघडे पाडले आहे.

पंतप्रधान मोदींचा विरोध करताना खरगे म्हणाले की, पंतप्रधान मोदींना कळले पाहीजे की, कुणाचा विरोध करायचा आहे आणि कुणाबद्दल बोलायचे आहे. अशा अवमानकारक विधानाला संसदीय कामकाजात थारा देता कामा नये. अनुराग ठाकूर यांनी जाणीवपूर्वक लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा अवमान केला आणि यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उडी का घेतली. अनेक पक्षांतील नेत्यांनी आंतरधर्मीय आणि आंतरजातीय लग्न केलेली आहेत. मग त्यांच्या प्रत्येकाची जातीची छाननी केली जाईल का? असा प्रश्न उपस्थित करत खरगे यांनी संसदेत सदस्यांच्या जातीविषयी चर्चा न होण्याविषयीचे मत मांडले.

Story img Loader