जगाचे लक्ष लागून राहिलेल्या Doomsday clock ची वेळ शास्त्रज्ञांनी कमी करत जग विनाशाच्या आणखी जवळ पोहचल्याचा इशारा दिला आहे. यानुसार आता मध्यरात्रीच्या १२ ला फक्त ९० सेकंद राहिले असून जगावरील संकट आणखी गडद झाल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. रशियाने युक्रेनवर केलेले आक्रमण,तिथे दीर्घकाळ सुरु असेललेल युद्ध, चिघळत चाललेली परिस्थिती आणि त्यामुळे त्याचे जगावर होत असलेल परिणाम, अमेरिका आणि नाटो यांनी युक्रेनबाबत घेतलेला पवित्रा या सर्व पार्श्वभूमीवर जगाच्या सर्वनाशाची वेळ ही ९० सेकंद दूर असल्याचं सांगण्यात आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘Doomsday clock’ नेमकं काय आहे?

पृथ्वीच्या सर्वनाशाची वेळ सांगणारे हे एक प्रतिकात्मक घड्याळ आहे. या घडाळ्यात जगात अणू युद्ध होत मध्यरात्री १२ वाजता जगाचा सर्वनाश होणार असे प्रतिकात्मक सांगण्यात आले आहे. जगातील अण्वस्त्रे आणि सद्यस्थिती यांची माहिती ठेवणाऱ्या अमेरिकेतील Bulletin of the Atomic Scientists या शास्त्रज्ञांच्या गटाने या घडाळ्याच्या संकल्पनेची निर्मिती ही १९४७ या वर्षी केली होती. अण्वस्त्रे, अणू ऊर्जा, त्यासाठी सुरु झालेली स्पर्धा यामुळे जगाचा विनाश जवळ आल्याची भावना तेव्हा शास्त्रज्ञांनी व्यक्त केली होती. तेव्हापासून जगातील बदलत्या परिस्थितीनुसार या घडाळ्यातील वेळ ही कमी जास्त केली जाते. यानुसार मिनीट काटा हा मध्यरात्री १२ पासून जेवढा दूर तेवढं जग सुरक्षित आहे असं समजलं जातं.

सध्या नेमका काय बदल करण्यात आला?

Bulletin of the Atomic Scientists च्या प्रतिनिधींनी Doomsday clock मधील मिनीट काटा हा मध्यरात्रीचे १२ या वेळेपासून ९० सेकंद जवळ आणून ठेवला आहे. म्हणजेच जगाच्या सर्वनाशापासून आपण सर्व प्रतिकात्मकरित्या खूप जवळ पोहचलो असल्याचं यामार्फत सांगण्यात आलं आहे. याआधी घडाळ्याची वेळ ही २०२० ला १०० सेकंद एवढी दूर अशी ठेवण्यात आली होती. आता त्यामध्ये १० सेकंद आणखी कमी करण्यात आले आहेत.

थोडक्यात या युद्धाशी संबंधित प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लोकांनी-देशांनी आणखी जबाबदारीने वागण्याची गरज यानिमित्ताने व्यक्त करण्यात आली आहे. या Doomsday clock मध्ये सर्वात जास्त वेळ ती म्हणजे १७ मिनीटे ही १९९१ च्या सुमारास होती. म्हणजेच जगाच्या विनाशापासून तब्बल १७ मिनिटे जग हे दूर होते, जग सुरक्षित झाले होते, कारण त्यावेळी सोव्हिएत रशियाचे पतन होत जीवघेणे शीत युद्ध हे समाप्त झाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doomsday clock set to new time now earth 90 seconds away from global catastrophe asj