Doordarshan Anchor Faints During Live News Reading : महाराष्ट्रासह देशभरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे उष्माघात बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. १ मार्च ते १२ एप्रिल या ४२ दिवसांत महाराष्ट्रात उष्माघाताने बाधित ७७ रुग्ण आढळले आहेत. त्यातील ३६ रुग्ण ८ ते १२ एप्रिल या पाच दिवसांत आढळले आहेत. दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालसह उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये तापमानाचा पारा ३५ अंशांच्या पुढे सरकला आहे. पश्चिम बंगालमध्ये शनिवारी उष्णतेची लाट आल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, डीडी बांगलाच्या (दूरदर्शन बंगाल) अँकर (वृत्तनिवेदक) लोपामुद्रा सिन्हा बातम्या वाचत असताना बेशुद्ध झाल्या. उष्माघाताची बातमी वाचत असतानाच त्यांना भोवळ आली. लोपामुद्रा बातम्या वाचत असताना बेशुद्ध झाल्याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. त्यानंतर लोपामुद्रा यांनी स्वतः फेसबूकवर लाईव्ह येऊन शनिवारी दूरदर्शनच्या स्टुडिओत नेमकं काय झालं याबाबत माहिती दिली आहे.
लोपामुद्रा सिन्हा यांनी त्यांच्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, लाईव्ह बातम्या वाचत असताना माझा रक्तदाब (बीपी) कमी झाला होता त्यामुळे मी बेशुद्ध झाले. गेल्या काही दिवसांपासून माझी तब्येत फार बरी नाहीये. त्या दिवशीदेखील मला बरं वाटत नव्हतं. मात्र मला वाटलं थोडं पाणी प्यायल्यावर बरं वाटेल. मी कधीच स्टुडिओत पाणी घेऊन जात नाही. १० मिनिटांसाठी मी स्टुडिओत जाऊन बातम्या वाचणार असेन, अथवा अर्थ्या तासासाठी, मी कधीच पाणी घेऊन जात नाही. त्या दिवशी मी स्टुडिओमधील व्यवस्थापकाला इशारा करून पाणी आणून देण्यास सांगितलं. मात्र त्यांनी पाणी आणण्यापूर्वीच मी बातम्या वाचत असताना बेशुद्ध झाले. मी त्यावेळी पाणी पिऊ शकले नाही.
नेमकं काय झालं होतं?
लोपामुद्रा सिन्हा म्हणाल्या, माझ्या डोळ्यासमोर अंधारी येत होती तेव्हा मी पाहिलं की, चार बातम्या बाकी आहेत. मला वाटलं या चार बातम्या मी पूर्ण करू शकेन. त्यातल्या दोन बातम्या मी कशाबशा वाचल्या. त्यानंतर तिसरी बातमी उष्माघाताशी संबंधित होती. ती बातमी वाचताना मला हळूहळू भोवळ येऊ लागली. त्यावेळी मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. मी ही बातमीदेखील पूर्ण करेन असं मला वाटलेलं. तेवढ्यात मला दिसणं बंद झालं. माझ्या डोळ्यांसमोर काळाकुट्ट अंधार होता. मला टेलिप्रॉम्प्टर दिसतच नव्हता. माझ्यासमोरचं दृष्य हळूहळू पुसट होत गेलं. सुरुवातीला वाटलेलं की, टेलिप्रॉम्प्टरच धिम्या गतीने चालतोय. मात्र मलाच दिसेनासं झालं होतं. तेवढ्यात मी डोळे मिटले.
पश्चिम बंगालमध्ये एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमान वाढलं आहे. राज्यातील बर्दवान जिल्ह्यातील पानागढमध्ये राज्यातील सर्वाधिक ४२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दोन दिवसांपूर्वीच जाहीर केलं होतं की, पश्चिम बंगालमध्ये पुढील दोन-तीन दिवसांमध्ये तापमान आणखी वाढेल, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. IMD ने अलर्टदेखील जारी केला आहे.
महाराष्ट्रातील अनेक भागात तापमानाचा पार ४० अंशांच्या पुढे
आद्रतायुक्त उष्ण वाऱ्यामुळे विदर्भ पुन्हा तापला आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील आजवरच्या सर्वोच्च तापमानाची नोंद शुक्रवारी अकोल्यात झाली. अकोल्याचे कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअवर गेले होते. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी विदर्भात सरासरी दोन, तर राज्याच्या अन्य भागांत सरासरी १.५ अंशांनी तापमान वाढले आहे. विदर्भात अकोला ४४.०, अमरावती ४२.८, चंद्रपूर ४३.८, वर्धा ४२.५, वाशिम ४३,६ आणि यवतमाळमध्ये ४२.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. अकोला येथे गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी २.७ अंशांनी तापमानात वाढ झाली आहे. विदर्भात शुक्रवारी कमाल पारा सरासरी ४२.५ अंशांवर राहिला. मराठवाड्यात परभणीत ४२.२ अंशांची नोद झाली. अन्य ठिकाणी सरासरी ४० अंशावर पारा राहिला. मध्य महाराष्ट्रात जळगावमध्ये ४३.२ अंश सेल्सिअस तापमान होते. त्या खालोखाल मालेगाव ४२.० आणि नगर ४० अंशांवर होते. मध्य महाराष्ट्रात सरासरी कमाल तापमान ३९ ते ४० अंशांवर होते.