पोरबंदर येथील समुद्रात भारतीय नौदलाकडून पाठलाग सुरू असताना उद्ध्वस्त झालेल्या संशयीत पाकिस्तानी नौकेभोवतीचे गुढ अद्यापही दूर झालेले नाही. कारण, आता याबाबतीत नवे पुरावे आणि शक्यता समोर येण्यास सुरूवात झाली आहे. नव्या शक्यतेनुसार ही नौका दारू आणि डिझेलची तस्करी करण्यासाठी वापरली जात असावी. पाकिस्तानच्या ग्वादार बंदरातून अवैधरित्या आणलेली दारू कराचीनजीकच्या केती बंदरात जाणाऱ्या नौकांपर्यंत पोहचवण्याचे काम ही नौका करत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय, मच्छिमारी नौकांच्या इंजिनाच्या क्षमतेचा विचार करता या कारवाईसाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर नौदलाने घेतलेल्या सहभागावरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
कराची बंदरानजीक असलेल्या केती बंदरातून निघालेले एक जहाज पोरबंदरवर दहशतवादी हल्ला करणार असल्याची खबर गुप्तचर विभागाला मिळाली होती. ३१ डिसेंबरची रात्र व १ जानेवारीची पहाट यादरम्यान हा हल्ला करण्याचे नियोजन होते. मात्र, पोरबंदरपासून ३६५ किमी अंतरावर आणि भारतीय सागरी हद्दीत आठ किमी आतपर्यंत घुसलेल्या या जहाजाला भारतीय तटरक्षक दलाने अडवले. तटरक्षक दलाने या जहाजाला अडवण्यासाठी गोळीबारही केला. ऐन समुद्रात हा थरार एक तास रंगला होता. मात्र, जहाजावरील चार जणांनी तटरक्षक दलाला दाद न देता जहाजाच्या डेकखाली जात स्फोटकांनी संपूर्ण जहाजच उडवून दिले. ज्वाळांनी लपेटलेले ते जहाज अखेरीस सागराच्या तळाशी गुडूप झाले. संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी हा सर्व थरार एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे विदीत केला. दरम्यान, गुप्तचर खात्याला यासंदर्भात कोणत्याही दहशतवादी ह्ल्ल्याचे पुरावे मिळाले नसल्याचे सरकारमधील उच्चपदस्थ सूत्रांकडून सांगण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा