Actor-politician Vijay on Ambedkar: दाक्षिणात्य अभिनेता विजय थलपतीने राजकारणात प्रवेश करून तमिळनाडूच्या राजकीय क्षेत्रात काही दिवसांपूर्वीच खळबळ उडवून दिली होती. आता २०२६ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी त्याने जोरदार तयारी केल्याचे दिसून येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त “आंबेडकर: द लिडर फॉर ऑल” या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. मात्र प्रकाशनाला तमिळनाडूमधील प्रसिद्ध दलित नेते थोल तिरुमावलावन यांनी आयत्यावेळी उपस्थित राहण्यास नकार दिला. थोल तिरुमावलावन हे व्हिसीके पक्षाचे नेते असून त्यांचा पक्ष राज्यातील सत्ताधारी द्रमुकचा सहयोगी पक्ष आहे. आंबेडकर यांच्यावरील पुस्तक प्रकाशनाला सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने अनुपस्थिती दर्शविल्यानतर अभिनेता विजय थलपतीने जोरदार टीका केली आहे.
विजय थलपतीने आपल्या भाषणात मणिपूरमधील हिंसाचाराचाही उल्ले केला. मणिपूरबाबत केंद्र सरकारने योग्य भूमिका नसल्याचा आरोप करत विजयने केंद्र सरकारवरही टीका केली. तसेच तमिळनाडूमध्ये दलितांच्या पाण्याच्या टाकीत मानवी मलमूत्र मिसळल्याच्या प्रकरणावरून त्याने राज्यातील सत्ताधारी द्रमुकवरही जोरदार टीका केली. विजयने तमिलगा वेत्री कळघम (Tamilaga Vettri Kazhagam) या राजकीय पक्षाची स्थापना केली असून २७ ऑक्टोबर रोजी लाखोंच्या जनसमुदायासमोर पहिली सभा घेतली होती.
हे वाचा >> लेख : आज आंबेडकरांचे विचार निरखताना…
दरम्यान दलित नेते थोल तिरुमावलावन हे द्रमुकच्या दबावामुळेच पुस्तक प्रकाशनाला आले नाहीत, असाही आरोप विजयने केला. विजयचे राजकारण हे सत्ताधारी द्रमुकच्या विरोधात आहे. त्यामुळे आपल्या घटक पक्षाचे नेते विजयसह एकत्र कार्यक्रमाला दिसल्यास त्याचा वेगळा अर्थ काढला जाऊ शकतो, तसेच आघाडी सरकारला धक्का बसू शकतो, त्यामुळे थोल तिरुमावलावन हे प्रकाशन सोहळ्यापासून दूर राहिले, असे सांगितले जाते.
आंबेडकरांचीही मान शरमेने खाली गेली असती
विजय आपल्या भाषणात म्हणाला, “मणिपूरमध्ये काय घडत आहे, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. केंद्रातील सरकार तेथील नागरिकांसाठी काहीही करत नाही. तर तमिळनाडूमधील सरकार तरी काय करतय? वेंगवायाळमध्ये दलित वापरत असलेल्या पाण्याच्या टाकीत मानवी मलमूत्र मिसळण्यात आले. पण या प्रकरणातही राज्य सरकारकडून काही हालचाल झाली नाही. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर असते तर त्यांचीही मान शरमेने खाली गेली असती.”
लोकशाही टिकवायची असेल तर संविधानाचे रक्षण झाले पाहीजे. ही जबाबदारी आता जनतेलाच उचलावी लागणार आहे. आंबेडकर आज असते, तर आजच्या भारताबद्दल त्यांनी काय विचार केला असता, असा प्रश्न मला पडतो. भारताचा जर विकास करायचा असेल तर लोकशाहीचे टिकणे फार गरजेचे आहे. त्यासाठी संविधानाचे रक्षण करावे लागेल आणि ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असेही अभिनेता विजय यावेळी म्हणाला.
हे ही वाचा >> आंबेडकरी अभिव्यक्तीला नवी पालवी…
निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने निवडणुका व्हाव्यात
निवडणूक आयोगावरील विश्वास उडत चालला आहे. याबाबत बोलताना विजय म्हणाला, “निवडणुका या मुक्त आणि पारदर्शक वातावरणात होणे गरजेचे आहे. यासाठी निवडणूक आयुक्तांची नेमणूक ही सर्वांच्या सहमतीने झाली पाहीजे. निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका होणे, ही लोकशाहीची महत्त्वाची प्रक्रिया आहे. मी हे म्हणत नाही की, पक्षपाती पद्धतीने निवडणुका होत आहेत. पण आज भारतातील जनतेचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडत चालला आहे. तो अबाधित राहावा, यासाठी निवडणूक आयोगाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.”