त्रिपुराचे राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांना बिहारचे राज्यपालपद सोपविण्यात आले आहे. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी शनिवारी सायंकाळी काढलेल्या अधिसूचनेत माजी मुख्यमंत्री व माजी राज्यपाल एस. सी. जमीर तसेच डॉ. अश्विनीकुमार यांची राज्यपालपदी नियुक्ती केली असून विद्यमान राज्यपाल देवानंद कोंवर आणि निखीलकुमार यांच्या बदल्या केल्या आहेत.
डॉ. पाटील २७ नोव्हेंबर २००९ पासून त्रिपुराचे राज्यपाल होते. प्रकृतीच्या कारणांमुळे ७७ वर्षीय पाटील यांना त्रिपुराऐवजी महाराष्ट्राशेजारच्या राज्यात बदली हवी होती. पण त्यांना राजकीयदृष्टय़ा महत्त्वपूर्ण असलेल्या बिहारची सूत्रे देण्यात आली आहेत. बिहारचे विद्यमान राज्यपाल देवानंद कोंवर यांची त्रिपुराला बदली करण्यात आली आहे. बिहारमध्ये उपकुलगुरु आणि प्र-कुलगुरु यांच्या नियुक्त्यांमुळे वादग्रस्त झालेले कोंवर यांचे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी मतभेद निर्माण झाले होते. वयोवृद्ध काँग्रेस नेते व नागालँडचे माजी मुख्यमंत्री तसेच गोवा आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल ८२ वर्षीय एस.सी. जमीर यांची ओडिशाच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ओडिशाचे राज्यपाल मुरलीधर भंडारे यांचा कार्यकाळ संपून सहा महिने लोटल्यानंतर त्यांच्या जागी जमीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केरळच्या राज्यपालपदी निखीलकुमार यांची बदली करण्यात आली आहे. निखीलकुमार यापूर्वी नागालँडचे राज्यपाल होते. कर्नाटकचे राज्यपाल हंसराज भारद्वाज गेल्या चौदा महिन्यांपासून केरळचे हंगामी राज्यपाल होते. सीबीआयचे माजी संचालक डॉ. अश्विनीकुमार यांची नागालँडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Story img Loader