काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर करोनासंदर्भातील आकडेवारीवरुन केलेल्या टीकेला केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी उत्तर दिलं आहे. राहुल गांधींना दिल्लीपेक्षा न्यू यॉर्कवर अधिक विश्वास आहे असा टोला हर्ष वर्धन यांनी लगावला आहे. इतकचं नाही तर त्यांनी काँग्रेस मेलेल्या व्यक्तींच्या नावाने राजकारण करत असल्याचा घणाघाती आरोपही हर्ष वर्धन यांनी केलाय.
हर्ष वर्धन यांनी राहुल गांधींनी केलेल्या ट्विटला उत्तर देताना काँग्रेसवर निशाणा साधलाय. “मृतांच्या नावाने राजकारण करणं काँग्रेसची पद्धत आहे. झाडांवरील गिधाडं सध्या दिसेनासी झाली अशली तर त्यांच्यातील ऊर्जा जमीनीवरील गिधडांमध्ये आल्यासारखं वाटत आहे. राहुल गांधींना दिल्लीपेक्षा न्यू यॉर्कवर अधिक विश्वास आहे. मृतांच्या नावाने राजकारण करणं हे जमिनीवरील ‘या’ गिधडांकडून शिकावं,” असं ट्विट हर्ष वर्धन यांनी केलं आहे.
आणखी वाचा- Coronavirus: गुजरात उच्च न्यायालय म्हणाले, “भारताची तुलना केवळ चीनसोबत होऊ शकते, पण…”
राहुल गांधींनी अमेरिकेतील न्यू यॉर्क टाइम्स वृत्तपत्राचा दाखला देत आकडे खोटं बोलत नाहीत पण भारत सरकार बोलतं असा टोला लगावला होता. न्यू यॉर्कमधील या वृत्तपत्राने भारत सरकार सांगत असलेले करोनाचे आकडे आणि प्रत्यक्षातील आकड्यांमध्ये तफावत असल्याचा दावा केला होता.
लाशों पर राजनीति, @INCIndia स्टाइल !
पेड़ों पर से गिद्ध भले ही लुप्त हो रहे हों, लेकिन लगता है उनकी ऊर्जा धरती के गिद्धों में समाहित हो रही है।@RahulGandhi जी को #Delhi से अधिक #NewYork पर भरोसा है।
लाशों पर राजनीति करना कोई धरती के गिद्धों से सीखे।@PMOIndia @BJP4India https://t.co/29D0yWU5wS
— Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) May 26, 2021
काय सांगते सरकारी आकडेवारी?
सोमवारी जवळजवळ ४० दिवसांनंतर दैनंदिन करोना रुग्णसंख्या दोन लाखांच्या खाली आल्यानंतर मंगळवारी या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात करोनाचे २ लाख ८ हजार ९२१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २ लाख ९५ हजार ९५५ करोना रुग्ण मंगळवारी करोनामधून बरे झाले आहेत. सध्या उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची संख्या २५ लाखांच्याही खाली आली आहे. मात्र त्याच वेळेस करोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण पुन्हा वाढल्याचं दिसून आलं आहे. गेल्या २४ तासांमध्ये करोनामुळे ४ हजार १५७ जणांचा मृत्यू झालाय. आरोग्यमंत्रालयाने बुधवारी यासंदर्भातील आकडेवारी जारी केली आहे. करोनामुळे होणाऱ्या मृत्यूची टक्केवारी ही १.१५ टक्के असल्याचं केंद्राचं म्हणणं आहे.