नवी दिल्ली : India Ex Prime Minister Dr. Manmohan Singh Funeral ‘भारतीय अर्थव्यवस्थेला उदारीकरणाची दिशा दाखवून विकासाच्या वाटेवर नेणारे ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व’ अशा भावनांनिशी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना देशातील विविध क्षेत्रांतून तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरून शुक्रवारी आदरांजली वाहण्यात आली. डॉ. सिंग यांच्यावर आज, शनिवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास दिल्लीतील निगमबोध घाट येथे लष्करी तसेच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सिंग यांच्या निधनाचा शोक म्हणून १ जानेवारीपर्यंत सर्व सरकारी कार्यालयांसह दूतावासांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर ठेवण्याचे सरकारने जाहीर केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार, केंद्रीय अर्थमंत्री आणि नंतर पंतप्रधान अशी महत्त्वाची पदे भूषवताना भारताच्या सर्वसमावेशक आर्थिक विकासालाच ध्येयस्थानी ठेवणारे डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांचे पार्थिव गुरुवारी मध्यरात्रीनंतर निवासस्थानी आणले गेले. डॉ. सिंग यांची मुलगी अमेरिकेतून शुक्रवारी मध्यरात्रीनंतर भारतात येणार असल्याने अंत्यसंस्कारासाठी शनिवारची वेळ निवडण्यात आली. दिल्लीतील निगमबोध घाट येथे सकाळी पावणेबाराच्या सुमारास डॉ. सिंग यांना अखेरचा निरोप देण्यात येणार आहे. तत्पूर्वी सकाळी ८ ते ९.३० या वेळेत डॉ. सिंग यांचे पार्थिव काँग्रेसच्या मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल, अशी माहिती काँग्रेसचे संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी दिली.

हेही वाचा >>> “डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी जागा द्या”, काँग्रेसची सरकारकडे मागणी

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, खासदार प्रियंका गांधी-वाड्रा यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांतील नेतेमंडळींनी तसेच सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी शुक्रवारी डॉ. सिंग यांच्या मोतीलाल नेहरू रोड येथील निवासस्थानी जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले. पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यापासून गेल्या दहा वर्षांपासून डॉ. सिंग यांचे येथेच वास्तव्य होते.

हेही वाचा >>> Dr. Manmohan Singh: आर्थिक सुधारणांचा शिल्पकार ते ‘अपघाती पंतप्रधान’; मनमोहन सिंगांना इतिहास न्याय देईल?

मंत्रिमंडळात शोकप्रस्ताव

डॉ. सिंग यांच्या निधनानंतर सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून शुक्रवारी सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये डॉ. सिंग यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शोकप्रस्ताव संमत करण्यात आला व त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रपती भवन, संसद भवन आदी संविधानिक व सरकारी ठिकाणांवरील तसेच, काँग्रेसच्या मुख्यालयातील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला. येत्या १ जानेवारीपर्यंत राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्यात येणार असून भारतीय दूतावासांनाही तशाच सूचना देण्यात आल्या आहेत. सिंग यांच्या अंत्यविधीच्या निमित्ताने सर्व केंद्रीय आस्थापनांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> अग्रलेख: मार्दवी मार्तंड!

डॉ. सिंग यांचे जीवन आदर्शवत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी एका ध्वनिचित्र संदेशाद्वारे डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली. ‘प्रतिकुल परिस्थितीत असंख्य अडथळे पार करून यशाच्या शिखरावर कसे पोहोचता येते, याचा उत्तम परिपाठ असलेला डॉ. सिंग यांचा जीवनपट येणाऱ्या पिढ्यांसाठी आदर्शवत असेल’, असे मोदी म्हणाले. ‘पंतप्रधान म्हणून डॉ. सिंग यांचे देशाच्या विकास आणि प्रगतीतील योगदान कायम स्मरणात राहील’, असेही मोदी यांनी या संदेशात म्हटले आहे.

स्मारक उभारण्याची मागणी

डॉ. मनमोहन सिंग यांचे स्मारक उभारता येईल, अशा ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात यावेत, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. दरम्यान सिंग यांच्या स्मारकास जागा न देणे हा देशाच्या पहिल्या शीख पंतप्रधानाचा अपमान ठरेल, असे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी नमूद केले. अकाली दलाचे सुखबिरसिंग बादल यांनी सिंग यांच्या स्मारकास जागा दिली जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

डॉ. मनमोहन सिंग यांच्या रूपात आपण सर्वांनीच विद्वत्ता, सभ्यता, विनयशीलतेचे प्रतिक असलेले नेतृत्व गमावले आहे. ते काँग्रेस पक्षासाठी तेजस्वी आणि प्रिय मार्गदर्शक होते. त्यांनी जी जी पदे भूषवली, त्या पदांची प्रतिष्ठा उंचावली आणि देशासाठी गौरवास्पद कामगिरी केली. सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही मूल्यांबद्दलची त्यांची बांधिलकी अतूट होती. – सोनिया गांधी, काँग्रेस नेत्या

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr manmohan singh funeral india former pm last rights at delhi nigambodh ghat on saturday december 28 zws