India Former PM Dr. Manmohan Singh Passes Away: भारताचे माजी पंतप्रधान ही सर्वात महत्त्वाची ओळख जरी असली, तरी त्याव्यतिरिक्त डॉक्टर मनमोहन सिंग यांचं कर्तृत्व हे खऱ्या अर्थानं विविधांगी होतं. त्यांच्या प्रगाढ ज्ञानाला सौजन्य आणि मितभाषित्वाची विलक्षण जोड होती. त्यांच्या शांत स्वभावावर होणारी टीकाही त्यांनी तितक्याच शांतपणे झेलली. गुरुवारी रात्री मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे एक मितभाषी सौजन्यच भारतीय राजकारणाच्या पटलावरून नजरेआड झाल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. पण फक्त भारतीयांनाच आपल्या नेत्याचं कौतुक होतं अशातला भाग अजिबात नाही. डॉ. मनमोहन सिंग यांच्या विलक्षण प्रतिभेला अमेरिकन संसदेत मिळालेलं ३ मिनिटांचं स्टँडिंग ओवेशन याचंच द्योतक होतं!
२०१९ साली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान त्यांचं अमेरिकन संसदेसमोर झालेलं भाषण विशेष चर्चेत राहिलं. यावेळी त्यांना मिळालेल्या स्टँडिंग ओवेशनचीही चर्चा झाली. मात्र, त्याहीवेळी मनमोहन सिंग यांना अशाच प्रकारे मिळालेल्या स्टँडिंग ओवेशनचे दाखले सोशल मीडियावर दिले गेले.
२००५ चा अमेरिका दौरा आणि आण्विक करार!
डॉ. मनमोहन सिंग २००५ साली अमेरिका दौऱ्यावर गेले होते. हा दौरा फक्त दिल्लीच नव्हे, फक्त भारतच नव्हे, तर अवघ्या जगाचं लक्ष वेधून घेणारा ठरला होता. त्यावेळी जगभरात फक्त एकच चर्चा होती, भारत-अमेरिका अणुकरार! डॉ. मनमोहन सिंग यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत गाठलेल्या अनेक मैलांच्या दगडांपैकी अमेरिकेसोबतचा अणुकरार ही सर्वात मोठी उपलब्धी ठरला. अनेक महिन्यांच्या चर्चांनंतर हा करार अस्तित्वात आला. याच करारावर स्वाक्षरी करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग अमेरिका दौऱ्यावर गेले होते.
दोन्ही देशांनी अणुकरारावर स्वाक्षरी केली आणि जगभरात त्याचे पडसाद उमटले. दोन देशांमध्ये झालेल्या एखाद्या कराराशी अवघ्या जगाचे हितसंबंध अशा प्रकारे जोडले जाण्याची ही घटना इतिहासातल्या काही निवडक घटनांपैकी एक ठरली. दोन्ही देशांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्यानंतर दोन दिवसांनी अमेरिकन संसदेसमोर डॉ. मनमोहन सिंग यांचं भाषण आयोजित करण्यात आलं होतं.
तीन मिनिटं टाळ्यांचा कडकडाट होतच राहिला!
डॉ. मनमोहन सिंग यांनी अमेरिकन संसदेत प्रवेश करताच तिथल्या सिनेट सदस्यांनी त्यांना उभं राहून टाळ्यांच्या कडकडाटात अभिवादन केलं. संसदेच्या प्रवेशद्वारापासून ते अध्यक्षांच्या खुर्चीसमोर नियोजित करण्यात आलेल्या भाषणाच्या जागेपर्यंत पोहोचेपर्यंत डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी अमेरिकन सिनेट सदस्यांमध्ये अहमहमिका लागल्याचं अवघ्या जगानं पाहिलं. हा सन्मान फक्त भारताच्या पंतप्रधानांचा नव्हता, तर डॉ. मनमोहन सिंग यांच्याठायी असणाऱ्या प्रगाढ ज्ञानाचा, त्यांच्या भूमिकांचा, त्यांच्यातल्या सौजन्यशील विद्वत्तेचा आणि त्यांच्या मितभाषी स्वभावाचाही होता!
Manmohan Singh : मनमोहन सिंग म्हणाले होते, “मी Accidental PM च नाही, तर अर्थमंत्रीही…”
डॉ. मनमोहन सिंग भाषणाच्या जागेवर पोहोचेपर्यंत जवळपास अडीच मिनिटं हा टाळ्यांचा कडकडाट थांबलाच नाही. मग काही क्षण अमेरिकन संसद सदस्यांनी उसंत घेतली. अध्यक्षांनी डॉ. मनमोहन सिंग यांची सभागृहाला औपचारिक ओळख करून दिली आणि पुन्हा एकदा आख्ख्या सभागृहानं पुढचा जवळपास मिनीटभर डॉ. मनमोहन सिंग यांना उभं राहून टाळ्यांच्या कडकडाटात अभिवादन केलं! पुढच्या ४० मिनिटांत डॉ. मनमोहन सिंग यांनी केलेल्या भाषणादरम्यान अमेरिकन संसद सदस्यांनी किमान ३२ वेळा उभं राहून टाळ्यांच्या गजरात अशाच प्रकारे अभिवादन केलं. तमाम भारतीयांसाठी हा सोहळा अभिमानाने भारून टाकणारा होता!