Turkey Earthquake: पश्चिम आशियातील तुर्कस्तान आणि सीरिया या देशांत झालेल्या भीषण भूकंपात आतापर्यंत ४५ हजारांहून अधिक मृत्यू झाले आहेत. लाखो लोक या भूकंपामुळे विस्थापित झाले आहेत. भूकंपाच्या प्रलयानंतर बचावकार्य सुरु असताना हृदय पिळवटून टाकणाऱ्या अनेक घटना घडत आहे. नुकतेच १२८ तासांनंतर एका दोन महिन्यांच्या बाळाला अतिशय सुखरुपणे ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले होते. मात्र या बाळाने आपले पालक गमावले. तर आता एका नवीन घटना समोर आली असून अंताक्या शहरात एका दाम्पत्याला तब्बल २९६ तासांनी ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढले गेले आहे. स्वतःचे मूत्रप्राशन करुन १२ दिवस हे दाम्पत्य ढिगाऱ्याखाली जिवंत राहिले. मात्र दुर्दैवाने त्यांना त्यांच्या दोन मुलांना गमवावे लागले आहे.
टर्कीच्या ॲनडोलू या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, टर्कीमधील अंताक्या येथे बचावकार्य सुरु असताना समीर मुहम्मद अकर (वय ४९), त्याची पत्नी रग्दा (४०) आणि त्यांच्या दोन मुलांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. किर्गिझस्तानमधील बचाव पथक इमारतींचा ढिगारा हटवत असताना या कुटुंबाला बाहेर काढण्यात आले. भूकंपाच्या २९६ तासांनंतर या कुटुंबाला बाहेर काढल्यानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी हलविण्यात आले. किर्गिझस्तानच्या बचाव पथकाने सांगितले की, आम्ही ढिगाऱ्याखालून दाम्पत्याला बाहेर काढले. त्यानंतर दोन मुलांनाही बाहेर काढण्यात आले. दोन्ही मुले याच दाम्पत्याची असल्याचे कळले.
हे वाचा >> या घटनेला लोक चमत्कार म्हणतायत! १२८ तासानंतर ढिगाऱ्याखालून नवजात बाळ सुखरुप बाहेर
मूत्रप्राशन करुन जिवंत राहिले
टर्कीचे आरोग्य मंत्री फहरेटीन यांनी अंताक्याला भेट दिली असताना त्यांनी या दाम्पत्याच्या तब्येतीची विचारपूस केली. ते म्हणाले की, वडील शुद्धीवर आले असून त्यांच्यावर मुस्तफा केमाल विद्यापीठ रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच अमेरिकेचे माजी सिनेटर डॉ. मेहमेट ओझ यांनी देखील मुहम्मद अकर यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली तसेच त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
यावेळी अमेरिकन सिनेटर डॉ. मेहमेत ओझ आणि मुहम्मद अकर यांच्या संभाषणाची माहिती ॲनाडोलू या वेबसाईटने दिली आहे. मुहम्मद अकर हे त्यांचे मूत्रप्राशन करुन इतके दिवस जिवंत राहिल्याचे वर्णन मेहमेत ओझ यांनी केले आहे. डॉ. ओझ यांनी असेही सांगितले, सुरुवातीचे दोन तीन दिवस त्यांच्या मुलांनी दाम्पत्याच्या आवाजाला प्रतिसाद दिला. मात्र त्यानंतर मुलांचा आवाज येणं बंद झालं. हाते प्रांतामध्ये अंताक्या हे शहर आहे. भूकंपाचा सर्वाधिक फटका बसलेल्या शहरांमध्ये अंताक्याचा समावेश होतो. टर्कीमध्ये आतापर्यंत ४१ हजार तर सीरियामध्ये ३ हजार ६८८ लोकांचा मृत्यू झाला आहे.