Sonia Gandhi On President Draupadi Murmu : देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज संसेदत अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाषण केलं. या भाषणावर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनीही या भाषणावर टीका केली. माध्यमांना प्रतिक्रिया देणं दोघांनीही टाळलं असलं तरीही त्यांना द्रौपदी मुर्मू यांचं भाषण आवडलं नसल्याचं त्यांनी कुजबुजत सांगितलं.

संसद परिसरात प्रियांका गांधी, राहुल गांधी आणि सोनिया गांधी एकत्र उभे होते. त्यांच्याभोवती पत्रकारांचा गराडा होता. द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या भाषणावर पत्रकार प्रश्न विचारत होते. पण या मुद्द्यावर थेट भाष्य करण्यास सोनिया गांधी यांनी नकार दर्शवला. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला संबोधित करताना केलेल्या भाषणासंदर्भात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी सूचक भाष्य केलं. राष्ट्रपती भाषण करता करता दमल्या. सोनिया यांचे चिरंजीव आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मूर्मू यांच्या भाषणाचा उल्लेख रटाळ असा केला. त्यांनी भाषणादरम्यान खोटी आश्वासनं दिली.

सोनिया गांधी पुढे म्हणाल्या, ‘राष्ट्रपती यांची भाषण करता करता चांगलीच दमछाक झाली. त्या कशाबशा बोलत होत्या. फारच वाईट’. सोनियांच्या या निरीक्षणाला राहुल गांधी होकार दिला. राष्ट्रपती यांनी भाषणात तेच तेच मुद्दे सांगितले असं राहुल गांधी म्हणाले.

भाजपाकडून प्रत्युत्तर

सोनिया आणि राहुल गांधींच्या या टीकेवर भाजपाने प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपतीचा अपमान केल्याचं भाजपाचे प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले. ते म्हणाले, या टीकेमुळे राजकारणातील गटार आणि काँग्रेसचे चारित्र्य उघड झाले आहे. “गांधी कुटुंबाबाहेरील कोणी उच्च संवैधानिक पदांवर विराजमान होऊ शकते ही बाब गांधी कुटुंब सहन करू शकत नाही. हा अपमान प्रत्येक भारतीयांचा अपमान आहे, प्रत्येक आदिवासीचा अपमान आहे, प्रत्येक स्त्रीचा अपमान आहे. हा देश हे सहन करणार नाही”, असं त्यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलंय.

दरम्यान, सर्वत्र सोनिया गांधींवर टीका होऊ लागल्यानंतर आता काँग्रेस नेते अशोक गहलोत यांनी सोनिया गांधींच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिली आहे. त्यात ते म्हणतात, “भाजपा नेता विनाकारण सोनिया गांधींसारख्या व्यक्तिमत्त्वावर आरोप लावत आहेत. हे अत्यंत निंदनीय आहे. सोनिया गांधींनी एक तास राष्ट्रपतींचं अभिभाषण ऐकलं. त्यासंदर्भात त्यांनी सहजपणे त्यांच्या भावना व्यक्त केल्या. पूर्ण देशाला माहितेय की सोनिया गांधी संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तींचा नेहमी आदर राखतात. भाजपा नेहमीप्रमाणे लक्ष विचलित करत आहेत.”

Story img Loader