नवी दिल्ली : संविधानातील मूल्यांची अंमलबजावणी कशी केली जाते त्यावर संविधानाचे यश अवलंबून असेल असे संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी म्हटले होते, अशी आठवण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी संविधान दिनानिमित्त संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या विशेष कार्यक्रमात करून दिली.
देशाने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान स्वीकारले, या ऐतिहासिक घटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मंगळवारी राष्ट्रपती मुर्मू यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांतील सदस्यांना उद्देशून केलेल्या भाषणात संविधानाचे महत्त्व विशद केले. डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यासह मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधानसभेचे सल्लागार व संविधानाचा मसुदा तयार करणारे बी. एन. राव तसेच, संविधान सभेतील १५ महिला सदस्य व संविधानाच्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले इतर अधिकारी या सर्वांचे त्यांच्या योगदानाबद्दल मुर्मूंनी आभार मानले.
संविधान हा आपल्या देशाचा पवित्र ग्रंथ असून आज आपण सर्वजण या ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार झालो आहोत. ७५ वर्षांपूर्वी याच दिवशी संविधान सभेने त्यावेळी नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशासाठी संविधान तयार करण्याचे मोठे कार्य पूर्ण केले. आपले संविधान आपल्या वैयक्तिक आणि सामूहिक स्वाभिमानाचे प्रतिक आहे, असे मुर्मू म्हणाल्या. या विशेष कार्यक्रमामध्ये ७५ रुपयांचे विशेष नाणे व टपाल तिकीट प्रसिद्ध करण्यात आले. संविधानाच्या संस्कृत आणि मैथिली आवृत्तीचेही प्रकाशन मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला, विरोधीपक्षनेते राहुल गांधी, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे उपस्थित होते.