डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (DRDO) बंगळुरू येथील एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (ADE) येथे फ्लाइट कंट्रोल सिस्टमसाठी संस्थात्मक तंत्रज्ञानाचा वापर करून विक्रमी ४५ दिवसांत एक बहुमजली इमारत बांधली आहे. अधिकाऱ्यांनी गुरुवारी यासंदर्भात माहिती दिली. भारतीय वायुसेनेसाठी (IAF) पाचव्या पिढीची, मध्यम-वजनाची लढाऊ विमाने विकसित करण्यासाठी या सात मजली इमारतीत सुविधा असतील.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, DRDO ने ADE, बंगळुरू येथे उड्डाण नियंत्रण प्रणालीसाठी हायब्रीड तंत्रज्ञानाद्वारे बहुमजली इमारतीचे बांधकाम विक्रमी ४५ दिवसांत पूर्ण केले. ही इमारत अॅडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट (AMCA) प्रकल्पांतर्गत लढाऊ विमाने आणि फ्लाइट कंट्रोल सिस्टमसाठी (FCS) नवीन मानकं विकसित करणं सुलभ करेल, असंही ते म्हणाले.
संरक्षण मंत्रालयाने सोमवारी सांगितले होते की, AMCA च्या डिझाईन आणि प्रोटोटाइप विकासासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची (CCS) मंजुरी मिळविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गुरुवारी या इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की AMCA प्रकल्प आणि संबंधित इतर कामांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा प्रदान करण्याच्या उद्देशाने केवळ ४५ दिवसांच्या कालावधीत संपूर्ण बांधकाम तंत्र वापरून इमारत बांधण्यात आली आहे.
भारत आपली हवाई उर्जा क्षमता लक्षणीयरीत्या वाढविण्यासाठी स्टेल्थ वैशिष्ट्यांसह पाचव्या पिढीचे मध्यम-वजनाचे लढाऊ विमान विकसित करण्यासाठी महत्त्वाकांक्षी AMCA प्रकल्पावर काम करत आहे. या प्रकल्पाचा प्रारंभिक विकास खर्च अंदाजे १५ हजार कोटी रुपये आहे.