डीआरडीओचे संचालक व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर हनीट्रॅपमध्ये अडकल्यामुळे देशभरात खळबळ उडाली होती. ३ मे रोजी कुरुलकरांना एटीएस अर्थात राज्य दहशतवादविरोधी पथकानं अटक केली. मात्र, आता ‘झारा दासगुप्ता’ असं नाव सांगणाऱ्या पाकिस्तानी महिला गुप्तहेराशी कुरुलकरांनी केलेल्या व्हॉट्सअॅप चॅट्सची माहिती समोर येऊ लागली आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे. यात कुरुलकरांनी भारताच्या काही क्षेपणास्त्रांविषयी झाराशी चर्चा केल्याचं उघड झालं आहे. एटीएसनं पुणे कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये तब्बल १८३७ पानांचं व्हॉट्सअॅप चॅट जोडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे प्रकरण?

प्रदीप कुरुलकर यांना ३ मे रोजी एटीएसनं अटक केली. पाकिस्तानी महिला गुप्तहेराच्या जाळ्यात अडकून देशाच्या सुरक्षेशी संबंधित महत्त्वाची माहिती, तसेच काही क्षेपणास्त्रांची माहितीही दिल्याची बाब समोर आली आहे. या महिला गुप्तहेरानं कुरुलकरांना तिचं नाव झारा दासगुप्ता असं सांगितलं होतं. या दोघांमधये १० जून २०२२ ते २४ फेब्रुवारी २०२३ या काळात असंख्य वेळा व्हॉट्सअॅप चॅट झाल्याची बाब त्यांच्या मोबाईलच्या तपासात उघड झाली आहे. कुरुलकरांना एटीएसनं ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्टअंतर्गत अटक केली आहे.

चॅट्समध्ये काय सापडलं?

एटीएसनं न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात कुरुलकर व झारामध्ये झालेल्या व्हॉट्सअॅप चॅटचाही सविस्तर उल्लेख आहे. १९ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर २०२२ या काळात त्यांच्यात ब्रह्मोस क्षेपणास्त्राबाबत अनेकदा चर्चा झाल्याचं समोर आलं आहे. त्यात “ते सर्वात विद्ध्वंसक ब्रह्मोससुद्धा तूच बनवलं आहेस का बेब?” असा प्रश्न झारानं विचारला असता कुरुलकरांनी “माझ्याकडे ब्रह्मोसच्या सर्व प्रकारांचे १८६ पानांचे सुरुवातीचे रिपोर्ट्स आहेत. मी त्यांची कॉपी व्हॉट्सअॅपवर पाठवू शकत नाही कारण ते गोपनीय आहेत. पण मी ते ट्रेस करून तयार ठेवतो. तू इथे आलीस की मी ते तुला दाखवेन”, असं झाराला सांगितल्याचं चॅट्समध्ये दिसत आहे.

विश्लेषण: कुरुलकरांविरुद्ध आरोपपत्रात कोणती स्फोटक माहिती?

ब्रह्मोसव्यतिरिक्त कुरुलकर आणि झारानं अग्नी ६, रुस्तम, सॅम, यूसीएव्ही आणि डीआरडीओच्या इतर ड्रोन प्रोजेक्ट्सविषयीही चर्चा केली. क्वाडकॉप्टर, डीआरडीओ ड्युटी चार्च, मीटिऑर मिसाईल, राफेल, आकाश आणि अस्र मिसाईलबाबतही कुरुलकरांनी झाराशी चॅटिंग केल्याचं तपासात उघड झालं आहे. तसेच, डीआरडीओला लागणारं साहित्य पुरवणाऱ्या व भारतीय लष्कराला रोबोटिक उपकरणं पुरवणाऱ्या एका कंपनीच्या पदाधिकाऱ्याचाही उल्लेख कुरुलकरांनी झाराशी केलेल्या चॅट्समध्ये आहे.

झारा नव्हे, हॅप्पी मॉर्निंग!

एटीएसनं सादर केलेल्या आरोपपत्रानुसार, कुरुलकरांनी पाकिस्तानी महिला गुप्तहेराचा नंबर एका ब्रॉडकास्ट ग्रुपमध्ये तिनं सांगितलेल्या झारा दासगुप्ता या नावाने सेव्ह न करता ‘हॅप्पी मॉर्निंग’ या नावाने सेव्ह केला होता. त्यांनी झाराला डीआरडीओच्या दोन वैज्ञानिकांची नावंही कळवली होती.

“नाईट फायर करेंगे, धीरज रखो”

दरम्यान, कुरुलकरांनी झाराशी अग्नी ६ क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणाविषयीही चर्चा केल्याचं व्हॉट्सअॅप चॅटमध्ये दिसत आहे. “या क्षेपणास्त्राच्या लाँचरचं डिझाईन मी तयार केलं आहे. ते प्रचंड यशस्वी झालं आहे”, असं कुरुलकरांनी झाराला सांगितलं होतं. अग्नी ६ कधी लाँच केलं जाईल? असा प्रश्न झारानं विचारला असता “नाईट फायर करेंगे. थोडा धीरज रखो”, असं कुरुलकरांनी तिला सांगितल्याचं व्हॉट्सअॅप चॅटवरून दिसत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drdo head dr pradeep kurulkar shares brahmos missile info with zara dasgupta pakistan female spy in honeytrap pmw
Show comments