नवी दिल्ली : आपल्या शेजाऱ्याची हत्या करण्यासाठी या महिन्याच्या सुुरुवातीला दिल्लीतील रोहिणी न्यायालयात जेवणाच्या डब्यात कथितरीत्या स्फोटक उपकरण (आयईडी) ठेवल्याबद्दल संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) वरिष्ठ शास्त्रज्ञाला पोलिसांनी अटक केली आहे.
या आयईडीमुळे ९ डिसेंबरला या न्यायालयाच्या १०२ क्रमांकाच्या खोलीत कमी तीव्रतेचा स्फोट होऊन त्यात एक जण जखमी झाला होता. याप्रकरणी भारतभूषण कटारिया (४७) या आरोपीला शुक्रवारी अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगतले.
दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी दिलेल्या माहितीनुसार, डीआरडीओत वरिष्ठ शास्त्रज्ञ असलेले कटारिया हे घटनेच्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता दोन बॅग घेऊन न्यायालय परिसरात आले आणि त्यापैकी एक बॅग त्यांनी खोली क्र. १०२ मध्ये ठेवली. १०.३५ वाजता ते तेथून निघून गेले. त्यांनी टिफिन बॉक्समध्ये आयईडी ठेवला होता व हा डबा असलेली बॅग त्यांनी कोर्टरूममध्ये ठेवली, कारण त्यांना वकील असलेल्या त्यांच्या शेजाऱ्याला ठार मारायचे होते. ‘या दोघांनीही एकमेकांविरुद्ध तक्रारी केल्या होत्या. कटारिया यांना वकिलाविरुद्ध आकस होता, असे सकृद्दर्शनी दिसते,’ असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.