Israel-Hamas Conflict: हमास अतिरेकी संघटनेचा म्होरक्या याह्या सिनवार याचा खात्मा केल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी युद्ध थांबविण्याबाबत मोठे विधान केले होते. जर हमासने बंदी केलेल इस्रायलचे नागरिक परत केल्यास युद्ध थांबविण्याची तयारी दर्शविली होती. मात्र आता रॉयटर्सने दिलेल्या बातमीनुसार, पंतप्रधान नेत्यानाहू यांच्या सिझेरिया शहरातील खासगी निवासस्थानाला ड्रोनने लक्ष्य करण्यात आले आहे. या हल्ल्याच्या वेळी नेत्यानाहू आणि त्यांच्या पत्नी घरी हजर नव्हत्या, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. तसेच या हल्ल्यात कुणीही जखमी झाले नसल्याचीही माहिती मिळत आहे.
नेत्यानाहू यांच्या निवासस्थानाव्यतिरिक्त आणखी दोन ड्रोन लेबनानमधून डागले गेले होते. पण हवाई दलाने ते हाणून पाडले. या हल्ल्यानंतर आता राजधानी तेल अविवमध्ये पुन्हा एकदा सायरनचा आवाज घुमू लागला आहे. लेबनानमधून हा ड्रोन हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. याह्या सिनवार याची हत्या केल्यानंतर दोनच दिवसांनी लेबनानकडून इस्रायलला लक्ष्य केल्याचे सांगितले जात आहे.
हमासचे कंबरडे मोडल्यानंतर इस्रायलने लेबनानमधील हेझबोला संघटनेला लक्ष्य केले होते. २७ सप्टेंबर रोजी बैरुतमध्ये इस्रायलने हल्ला करून हेझबोलाचा प्रमुख हसन नसरल्लाह याला ठार केले होते. यानंतर हेझबोलाने इस्रायलचा सूड उगविण्याची शपथ घेतली होती. तेव्हापासून इस्रायल आणि लेबनान यांच्यात उघड युद्ध सुरू आहे. लेबनाने इस्रायलवर मध्यंतरी १८० क्षेपणास्त्रही डागले होते. इस्रायल आणि हेझबोला यांच्या संघर्षामध्ये आतापर्यंत २,३५० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर १०,९०६ लोक जखमी झाले आहेत.
इस्रायली संरक्षण दलाने (आयडीएफ) रफाह येथे केलेल्या हल्ल्यात याह्या सिनवार मारला गेला असल्याचे इस्रायलने गुरुवारी सांगितले. इस्रायलच्या ड्रोन व्हिडीओमध्ये हल्ल्यानंतर याह्या सिनवार दिसत असल्याचा दावाही करण्यात आला आहे. ‘कसाई’ म्हटल्या जाणाऱ्या याह्या सिनवारचा हल्ल्यात मृत्यू झाल्याचा व्हिडीओ इस्रायलच्या लष्कराने शेअर केला असून त्यात याह्या सिनवार एका हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या घरात जखमी अवस्थेत बसल्याचे दिसत आहे.