Delhi Drugs Racket : दिल्ली पोलिसांनी दिल्लीमधील ग्रेटर नोएडामध्ये छापेमारी करत ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी केलेल्या छापेमारीत तब्बल ९५ किलो ड्रग्ज आढळून आलं आहे. हे ड्रग्ज जप्त करत पोलिसांकडून तीन जणांना अटक करण्यात आलं आहे. दिल्लीमधील एक व्यापारी आणि मुंबईतील एका केमिस्टद्वारे हे ड्रग्ज रॅकेट चालवलं जात होतं, अशी माहिती या कारवाईनंतर समोर आली आहे.
तसेच या ड्रग्ज रॅकेटमध्ये तिहार जेलच्या वॉर्डनचाही सहभाग असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यानंतर दिल्ली पोलिसांनी वॉर्डनला अटक केली असून पुढील तपास करण्यात येत आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांना या ड्रग्ज रॅकेटसंदर्भात माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत तब्बल कोट्यवधींचं ९५ किलो ड्रग्ज जप्त केलं.
दरम्यान, या ड्रग्ज रॅकेटमध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे? हे ड्रग्ज कोठे विकले जात होते? या संपूर्ण प्रकरणात तिहार जेलचा वॉर्डनचा कसा सहभाग होता? त्याच्यासह आणखी कोण आणि कोठून सहभागी होते? ड्रग्ज कशा प्रकारे तयार केले जात होते? अशा प्रकारची चौकशी आता पोलिसांकडून केली जाणार आहे. या संदर्भातीलवृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे. २५ ऑक्टोबर रोजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने गौतम बुद्ध नगर येथील एका लॅबवर छापा टाकला होता. या कारवाईत कोट्यवधींचे ९५ किलो ड्रग्ज आणि ड्रग्ज तयार करण्यासाठी लागणारे काही साहित्य पोलिसांनी जप्त करण्यात आलेलं आहे.