अलीकडेच सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि पंजाब पोलिसांनी पाकिस्तानी सीमेतून भारतात घुसखोरी करणारं ड्रोन पाडलं होतं. संबंधित ड्रोनचं तांत्रिक विश्लेषण करण्यात आलं आहे. यातून पाकिस्तानस्थित दहशतवादी गटाचं काळं कृत्य समोर आलं आहे. ड्रोनच्या उड्डाण मार्गाच्या विश्लेषणानुसार, संबंधित ड्रोन सर्वप्रथम भारतातून पाकिस्तानात गेलं होतं. त्यानंतर ते शस्त्रांसह परत भारतात आलं होतं. दरम्यान सुरक्षा दलाच्या जवानांनी कारवाई करत ते पाडलं.

जप्त केलेल्या ड्रोनच्या विश्लेषणात असं आढळून आलं की, संबंधित ड्रोनच्या उड्डाणाचा मार्ग हा पंजाबमधील एका ठिकाणाहून पाकिस्तानातील एका ठिकाणापर्यंत होता. त्यानुसार लोकेशन्सच्या आधारे गुन्हा दाखल करत स्थानिक पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे. अमृतसर आणि तरन गावातून हे ड्रोन अनेकदा नियंत्रित केल्याचं तपासात उघड झालं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “शस्त्रं, ड्रग्स आणि दारूगोळा अपलोड केल्यानंतर संबंधित ड्रोन पाकिस्तानमधील अज्ञात व्यक्तींनी भारतात परत पाठवलं होतं. दरम्यान, हा धक्कादायक प्रकार सुरक्षा दलाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने हे ड्रोन पाडलं.” गेल्या महिन्यात केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत देखील त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.

९ जानेवारी रोजी पंजाबमधील अमृतसरमध्ये सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानातून भारतात प्रवेश करणाऱ्या ड्रोनवर गोळीबार करत पाडलं होतं. ड्रोनमधून सुमारे ७० कोटी रुपयांचं १० किलोहून अधिकचं हेरॉईन जप्त करण्यात आलं होतं. या ड्रोनने सर्वप्रथम भारतातून उड्डाण केल्याचं पंजाब पोलिसांच्या तपासात आढळून आलं आहे.

पंजाब पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ड्रोन सर्वप्रथम भारतातून नियंत्रित करण्यात आलं होतं. त्यानंतर ते ड्रोन पाकिस्तानात गेलं आणि ९ जानेवारी रोजी १० किलो हिरॉईनसह भारतीय हद्दीत आलं होतं. पण सीमा सुरक्षा दलाने ते पकडलं.