दुकानातून माल खरेदी केल्यानंतर त्याचे पैसे मागितले म्हणून एका पोलिसाने मद्यधुंद अवस्थेत दुकानात गोंधळ घातल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. सध्या सोशल मीडियावर या प्रकरणाची जोरदार चर्चा चालू असून असे अनुभव आलेले नेटिझन्स त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडीओ व्हायरल झालेलं हे प्रकरण उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये घडलं असून त्यावर कानपूर पोलीस आयुक्तालयाकडून रीतसर माहितीही देण्यात आली आहे.
मद्यधुंद पोलीस, आक्रमक दुकानदार
फ्री प्रेस जर्नलनं दिलेल्या वृत्तानुसार, कानपूर शहरातल्या एका मिठाईच्या दुकानातला हा व्हिडीओ आहे. या पोलिसानं मिठाईच्या दुकानातून काही पदार्थ खरेदी केले. दुकानदारानं दिलेल्या वस्तूचे पैसे पोलिसाकडून मागितले. मात्र, यावरून हा पोलीस चांगलाच संतापला. दुकानदाराशी अरेरावी सुरू झाली. या सगळ्या प्रकाराचा व्हिडीओ दुकानदातल्या कर्मचाऱ्यांपैकीच एकानं काढला. या व्हिडीओमध्ये हा पोलीस अधिकारी दुकानदारावर अरेरावी करताना दिसत आहे. पण दुकानदारही आक्रमकपणे या पोलिसाला उत्तर देतानाही दिसत आहे.
व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरू होताच पोलीस मवाळ
दरम्यान, आधी आक्रमकपणे अरेरावी करणारा पोलीस अधिकारी व्हिडीओ रेकॉर्डिंग चालू असल्याचं समजताच मवाळ झाल्याचं दिसत आहे. व्हिडीओ रेकॉर्डिंग पाहून या पोलिसानं लागलीच त्याच्या मोबाईल फोनवरून कुणालातरी फोन केला. त्यावर आपल्याला ‘दुकानदार त्रास देत आहे, तुम्ही लवकर या’ असं सांगताना पोलीस अधिकारी दिसत आहे.
“आधी माझे ११० रुपये द्या”
अशाच दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये दुकानदार पोलिसाला आधी माझे ११० रुपये द्या, असं बजावताना दिसत आहे. यावर पोलिसानं कोड स्कॅन करून ऑनलाईन पैसे पाठवण्याचाही प्रयत्न केला. मात्र, ते होऊ शकलं नाही. त्यामुळे मद्यधुंद पोलिसाला कोडही स्कॅन करता येत नाही इतका तो नशेच्या आहारी असल्याचं दुकानदार म्हणताना दिसत आहे.
कानपूर पोलीस आयुक्तालयाचं ट्वीट
दरम्यान, हा व्हिडीओ पोस्ट करून काही नेटिझन्सनी थेट कानपूर पोलीस आयुक्तालयाला टॅग करून जाब विचारला. त्यावर पोलीस आयुक्तालयानेही उत्तर देत संबंधित पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली आहे. या पोलीस अधिकाऱ्याचं नाव पोलीस उपनिरीक्षक सर्वेंद्र कुमार असल्याचंही या ट्वीटमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.