भारतात करोना वॅक्सीनची तयारी पूर्ण झाली आहे. आता प्रत्यक्ष लसीकरण सुरू होण्याच्या तारखेची घोषणा होण्या अगोदर, सर्व आवश्यक तयारी झाले आहे का नाही? याची पडताळणी करण्यासाठी केंद्र सरकारकडून आजपासून (२ जानेवारी) देशातील प्रत्येक राज्यात करोना वॅक्सीनच्या पार्श्वभूमीवर ‘ड्राय रन’ (सराव फेरी) घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार आज संपूर्ण देशभरात हा ‘ड्राय रन’ होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांची या ‘ड्राय रन’साठी निवड केली गेली आहे. ज्यामध्ये पुणे, नागपूर, नंदुरबार व जालना या जिल्ह्यांचा समावेश आहे.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितल्यानुसार, सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशांच्या एकूण ११६ जिल्ह्यांमध्ये २५९ जागांवर आज COVID-19 वॅक्सीनसाठी ‘ड्राय रन’ घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी माहिती देताना सांगितले की, ‘ड्राय रन’साठी संपूर्ण तयारी झालेली आहे. यासाठी विविध पथकांची निर्मिती केली गेली आहे.

राज्यभरात आज लसीकरणाची सराव फेरी

पुणे जिल्ह्य़ातील तीन ठिकाणी करोना लसीकरण सराव फेरी घेण्यात येईल. सकाळी ९ वाजता पुण्यातील जिल्हा औंध रुग्णालय, पिंपरी-चिंचवड येथील जिजामाता रुग्णालय आणि ग्रामीण भागातील माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ही सराव फेरी होणार आहे. पुणे शहर आणि जिल्ह्य़ात तीन ठिकाणी प्रत्येकी २५ आरोग्य कर्मचाऱ्यांना या चाचणीत सहभागी करून घेतले जाणार आहे. या ७५ आरोग्य कर्मचाऱ्यांची जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच करोना लसीकरणासाठी तयार केलेल्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली आहे, अशी माहिती राज्य लसीकरण अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी दिली.

‘कोव्हिशिल्ड’ला मंजुरी

देशभरात आज(शनिवार) होणाऱ्या लसीकरणाच्या सराव फेरीच्या पाश्र्वभूमीवर काल (शुक्रवार) केंद्रीय औषध मानक नियामक संस्थेच्या (सीडीएससीओ) तज्ज्ञ समितीची बैठक झाली. या बैठकीत ‘कोव्हिशिल्ड’ लशीच्या आपत्कालीन वापरास तज्ज्ञ समितीने मंजुरी दिली. आता भारताच्या महाऔषध नियंत्रकांच्या (डीसीजीआय) परवानगीची प्रतीक्षा आहे. त्यांनी परवानगी दिल्यानंतर भारतात आपत्कालीन वापरास मंजुरी मिळवणारी ही पहिली लस ठरणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dry run for covid19 vaccine administration to be conducted in all states union territories today msr
Show comments