college principal coats classroom with cow dung Viral Video : दिल्ली विद्यापीठाच्या लक्ष्मीबाई कॉलेजच्या प्राचार्यांचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये त्या एका वर्गाच्या भिंती गायीच्या शेणाने सारवताना दिसत आहेत. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर विविध चर्चांना सुरूवात झाली आहे.

दरम्यान या कॉलेजच्या प्राचार्य प्रत्युष वत्सला यांनी यासंबंधी स्पष्टीकरण दिले आहे. पीटीआयला सांगितले की, एका सहकारी प्राध्यापकाकडून केल्या जात असलेल्यासंशोधन प्रकल्पाचा एक भाग होता.

“हे सध्या प्रक्रियेत आहे. एक आठवड्यानंतरच मी संपूर्ण संशोधनाबद्दल अधिक माहिती देऊ शकेल. हे संशोधन पोर्टा केबिनमध्ये केले जात आहे. ज्यापैकी एक मी स्वतः सारवले कारण नैसर्गिक चिखलाला स्पर्ष करण्यामध्ये कोणताही धोका नाही. पूर्ण माहिती जाणून न गेताच काही लोक चुकीची माहिती पसरवत आहेत,” असेही त्या म्हणाल्या.

सोशल मीडीयावर व्हिडीओची चर्चा

दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये वत्सला या त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने भिंतीं शेणाने सारवताना दिसत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी स्वतः हा व्हिडीओ कॉलेजच्या शिक्षकांच्या ग्रुपमध्ये शेअर केल्याचे सांगितले जात आहे. ज्यामध्ये त्यांनी सी ब्लॉकमधील वर्ग खोल्या थंड ठेवण्यासाठी स्वदेशी पद्धतींचा अवलंब केला जात असल्याचे म्हटले होते. “येथे ज्यांचे वर्ग आहेत त्यांना लवकरच या खोल्या नव्या रुपात पाहायला मिळतील. शिकवण्याचा अनुभव आनंददायी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत,” असेही त्यांनी त्यांच्या मेसेजमध्ये लिहिले होते.

दरम्यान झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचे नाव देण्यात आलेले हे महाविद्यालय १९६५ मध्ये स्थापन करण्यात आले असून हे अशोक विहार येथे आहे. तसेच हे महाविद्यालय दिल्ली सरकारच्या अंतर्गत येते. या महाविद्यालयात पाच ब्लॉक आहेत, आणि शेणाने भिंती सारवण्याचा प्रकार यापैकी एका ब्लॉकमध्ये करण्यात आला आहे.

सोशल मीडीयावर प्राचार्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहे. काही जण वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगण्याच्या मुद्द्यावर यावरून टीका करताना देखील पाहायला मिळत आहेत.