नववर्षांच्या स्वागतासाठी दुबई येथे करण्यात आलेल्या आतषबाजीने आतापर्यंतच्या सर्वात मोठय़ा आतषबाजीचा गिनीज बुकातील विक्रम मोडला आहे. या आतषबाजीसाठी पाच लाख दारूगोळ्यांचा वापर करण्यात आला व त्याचे नियोजन दहा महिने आधी करण्यात आले होते. नववर्षदिनाच्या स्वागतासाठी सहा मिनिटे आतषबाजी करण्यात आली. त्यावेळी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रतिनिधी तेथे उपस्थित होते. शहराच्या ९४ कि.मीच्या सागर किनाऱ्याचा आसमंत या आतषबाजीने उजळून निघाला होता. दुबईतील पाम जुमेरा, वर्ल्ड आयलंड्स, बुर्ज खलिफा व बुर्ज अल अरब या महत्त्वाच्या ठिकाणांचा आतषबाजीच्या ठिकाणांमध्ये समावेश होता. सगळ्यात शेवटी सागरी किनाऱ्याच्या पाश्र्वभूमीवर सूर्योदयाचा कृत्रिम देखावा आतषबाजीच्या मदतीने साकारण्यात आला. २०१२ मध्ये कुवेतच्या सुवर्णजयंती निमित्त आयोजित आतषबाजीत ७७,२८२ दारूगोळे वापरण्यात आले होते. दुबईत हा विक्रम मंगळवारी मोडण्यात आला. अमेरिके तील न्यूयॉर्कच्या ‘फायरवर्क्स बाय ग्रुसी’ या कंपनीने या पायरोटेक्निक शोचे नियोजन केले होते. त्यात शंभर संगणकांनी नियंत्रण साधण्यात आले व संगीताचा तालही धरण्यात आला होता. एकूण २०० तज्ज्ञांनी ५००० मानवी तास काम करून अगदी मिलीसेकंदापर्यंत या आतषबाजीचे अचूक नियंत्रण केले. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचे जागतिक अध्यक्ष अलिस्टर रिचर्ड्स हे दुबईतील आतषबाजी पाहून भारावून गेले. खास ही आतषबाजी बघण्यासाठी लंडनहून दुबईला आले होते.
‘टाइम स्क्वेअर’मध्ये जनसागर
न्यूयॉर्क : वैशिष्टय़पूर्ण वेषभूषा केलेल्या, वैशिष्टय़पूर्ण टोप्या घातलेल्या उत्साही जनांचा सागर न्यूयॉर्कमधील सुप्रसिद्ध ‘टाइम स्क्वेअर’मध्ये २०१४ च्या स्वागतासाठी मंगळवारी मध्यरात्री लोटला होता़
उत्साहाच्या भरात कोणी आरोळ्या ठोकत होत़े एवढय़ात तो क्षण उगवला़ रंगबेरंगी कागदी कपटय़ांची उधळण करणारा तो ‘स्फटिक चेंडू’ बरोबर बाराच्या ठोक्याला खाली सोडण्यात आला आणि उत्साहाची एकच लाट लंडन, दुबई करीत जगभर पसरली़ अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सोनिया सोतोमायोर यांनी बारा वाजण्याआधीची साठ सेकंद मोजली आणि बाराच्या ठोक्याला तो ‘स्फटिक चेंडू’ उडविण्याची कळ दाबली़
दुबईत आतषबाजीचा जागतिक विक्रम
नववर्षांच्या स्वागतासाठी दुबई येथे करण्यात आलेल्या आतषबाजीने आतापर्यंतच्या सर्वात मोठय़ा आतषबाजीचा गिनीज बुकातील विक्रम मोडला आहे.

First published on: 02-01-2014 at 02:57 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dubai bid to break fireworks record