दुबईचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन रशिद अल मकतौम यांनी आपली पूर्वाश्रमीची पत्नी हया बिंत अल हुसेन, त्यांच्या वकील आणि जवळच्या व्यक्तींची हेरगिरी करण्यासाठी थेट इस्राईलच्या पेगॅसस सॉफ्टवेअरचा वापर केल्याचं उघड झालंय. या प्रकरणी ब्रिटनच्या उच्च न्यायालयाने निकाल देताना शेख मोहम्मद यांच्यावर गंभीर ताशेरे ओढले आहेत. मोहम्मद आणि हया यांच्यात घटस्फोटानंतर मुलांच्या ताब्यावरुन न्यायालयीन लढाई सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोहम्मद यांनी पत्नी हया आणि त्यांची वकील यांच्यावर पाळत ठेवली. यासाठी त्यांनी लंडनमधील हया यांच्या घराजवळच घर विकत घेतलं. यातून हया यांना लक्ष्य करण्यात आलं, त्यांना असुरक्षित वाटले अशी कृत्यं करण्यात आली आणि त्यांना श्वासही घेता येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण केल्याचं निरिक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे.

शेख मोहम्मद आणि हया यांच्यातील कौटुंबिक वाद काय?

शेख मोहम्मद आणि हया यांनी घटस्फोट घेतला आहे आणि सध्या त्यांच्यात मुलांच्या ताब्यावरुन न्यायालयात लढाई सुरू आहे. त्यांना जलिला (१३ वर्षे) आणि झायेद (९ वर्षे) अशी दोन मुले आहेत. या दोघांनाही घेऊन हया ब्रिटनमध्ये पळून आल्या. त्यानंतर ही ताब्याची लढाई सुरू झालीय. आता हया यांना आपल्या मुलांच्या सुरक्षेची काळजी लागली आहे. मोहम्मद यांना हया यांचे त्यांच्या ब्रिटनच्या सुरक्षारक्षकासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय आहे. त्यामुळे पाळत ठेवल्याचा आरोप हया यांनी केलाय.

शेख मोहम्मद यांच्याकडून ब्रिटनच्या न्यायालयाचा निकाल अमान्य

शेख मोहम्मद यांनी ब्रिटनच्या उच्च न्यायालयाने दिलेला हा निकाल अमान्य केलाय. तसेच या निकालात मांडलेली निरिक्षणं फेटाळली आहेत. तसेच हा निकाल अर्धवट माहितीवर आधारीत असून योग्य नाही, अशी प्रतिक्रिया दिलीय. शेख मोहम्मद म्हणाले, “मी कायमच माझ्यावरील हे आरोप फेटाळले आहेत. यापुढेही मला हे आरोप मान्य नाही. हे प्रकरण दुबईच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नाशी संबंधित आहे. या खटल्यात संयुक्त अरब अमिरात किंवा दुबई अमिरात कोणाचाही सहभाग नव्हता. त्यामुळेच या खटल्याचा निकाल अर्धवट माहितीवर आधारीत आहे.”

हेही वाचा : दुबईच्या उद्योगपतीचा पुण्यात संमतीने घटस्फोट

इस्राईलच्या एनएसओच्या पेगॅससचा उद्देश केवळ राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणासाठी

विशेष म्हणजे इस्राईलची एनएसओ कंपनीने पेगॅसस राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर वापरण्यासाठीचं तंत्रज्ञान असल्याचा दावा केलाय. तसेच हे सॉफ्टवेअर केवळ सरकारांना किंवा सरकारी तपास संस्थांनाच दिले जात असल्याचंही सांगितलंय. त्यामुळे असं असतानाही शेख मोहम्मद यांनी व्यक्तिगत कारणाने पेगॅससचा वापर केल्यानं जगभरात या प्रकरणावर चर्चांना उधाण आलंय. यानंतर पेगॅससची निर्मिती करणाऱ्या एनएसओने हया यांच्या वकिलाला यावर स्पष्टीकरण दिलंय. आम्ही लगेच यावर प्रतिक्रिया देऊ शकणार नाही. मात्र, पेगॅससचा दुरुपयोग झाला असल्यास आम्ही त्यावर कारवाई करु, असं एनएसओने म्हटलंय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dubai pm shaikh mohammed order to hack ex wife phone observe uk court pbs