दुबईहून कोचीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बिघाड झाल्याची घटना घडली आहे. परिणामी विमानाला मुंबई विमानतळावर सुरक्षितरित्या उतरवण्यात आले आहे. सर्व प्रवासी सुखरुप असून विमानात नेमका कोणता बिघाड झाला होता याबाबत तपासणी करण्यात येत आहे.
हेही वाचा- ‘माझ्या बॅगेत बॉम्ब आहे’; पटणाहून दिल्ली जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात प्रवाशाची धमकी
नागरी विमान वाहतूक महासंचालयाकडून घटनेची गंभीर दखल
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे एआय ९३४ क्रमांकाचे विमान दुबईहून कोचीला चालले होते. विमानात २५० प्रवासी होते. मात्र, प्रवासादरम्यान अचानक केबिनमध्ये हवेचा दाब कमी झाल्याची सूचना वैमानिकाला मिळाली. या बिघाडानंतर विमान मुंबई विमानतळावर सुरक्षितरित्या उतरवण्यात आले. नागरी विमान वाहतूक महासंचालयाकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून या प्रकरणी चौकशी सुरु आहे.
अनेक विमानांमध्ये बिघाड
गेल्या काही दिवसांमध्ये अनेक विमानांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या अगोदर इंडिगोचे शहाराजहून हैदराबादला जाणारे विमान तांत्रिक बिघाडामुळे कराचीला वळवण्यात आले होते. तसेच दिल्लीहून गुवाहाटीला जाणाऱ्या गो फर्स्टच्या विमानाचे विंडशील्ड तुटल्यामुळे विमान जयपूर विमानतळावर उतरवण्यात आले होते. त्यानंतर गो फर्स्टच्याच मुंबई-लेह आणि श्रीनगर-दिल्ली विमानांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांची उड्डाणे रद्द करण्यात आली होती.