स्तनाचा कर्करोग अतिशय आक्रमक व उपचारांना दाद देईनासा होतो तेव्हा त्याला कारणीभूत असलेले एक प्रथिन ऑस्ट्रेलियाच्या वैज्ञानिकांनी शोधून काढले आहे.
सिडनीच्या गॅरवन इन्स्टिटय़ूटचे ख्रिस ओरमंडी यांनी सांगितले की, एएलएफ ५ हे या नवीन प्रथिनाचे नाव असून त्यामुळेच कर्करोग अधिक आक्रमक बनतो व उपचारांना दाद देत नाही.
एबीसीच्या वृत्तानुसार ख्रिस ओरमंडी यांनी या प्रथिनाचा गेली दहा वर्षे अभ्यास केला असून ते स्तनाच्या कर्करोगात खलनायकाची भूमिका पार पाडते हे निश्चित झाले आहे. अस्तित्वात असलेली गाठ ही तीव्र ओस्ट्रोजेन असलेल्या गाठीत रूपांतरित होण्याची प्रक्रिया ही इएलएफ ५ या प्रथिनामुळे घडते.
ओरमंडी यांनी सांगितले की, ऑस्ट्रोजेन विरोधी उपचारांना दाद न देणाऱ्या कर्करोगाच्या गाठी या एएलएफ-५ चे प्रमाण वाढल्याने तयार होतात व उपचारांना दाद देत नाहीत. अनेकदा स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग असेल तर ओस्ट्रोजेनचे उपचार वाढवले जातात पण कर्करोगाच्या गाठींवर त्याचा काही परिणाम होत नाही.
टिश्यू कल्चर मॉडेलमध्ये जेव्हा यावर प्रयोग करण्यात आले तेव्हा स्तनाच्या कर्करोगाच्या गाठी या ऑस्ट्रोजेन विरोधी उपचारांना दाद देत नसल्याचे दिसले व त्याचवेळी पेशींमध्ये इएलएफ-५ हे प्रथिन वाढलेले दिसले. त्यामुळे कर्करोगावरील उपचारात यापुढे इएलएफ-५ या प्रथिनाला रोखण्याची उपाययोजना करणे महत्त्वाचे ठरणार आहे. पीएलओएस बायॉलॉजी या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
चौकट
खलनायक प्रथिनाचे नाव एएलएफ-५
प्रथिनाचे पेशीतील प्रमाण वाढल्यास ऑस्ट्रोजन विरोधी उपचारांना दाद दिली जात नाही, परिणामी कर्करोग आक्रमक बनतो.

Story img Loader