नवी दिल्ली : जगभरातील विविध ठिकाणी २०२३मध्ये पर्यावरणाशी संबंधित घडलेल्या टोकाच्या घटना या जगाचे तापमान वाढत असल्याच्या अंदाजाला दुजोरा देणाऱ्या होत्या असा निष्कर्ष एका अभ्यास अहवालात काढण्यात आला आहे. या अभ्यासात गेल्या वर्षीच्या वातावरण आणि हवामानाचा आढावा घेण्यात आला आहे. त्यावरून जागतिक तापमान वाढत असल्याचे पूर्वीचे अंदाज खरे ठरत असल्याचे दिसत आहे असे संशोधकांनी नमूद केले आहे.
हेही वाचा >>> इंडिया सत्तेत आल्यास ‘सीएए’ रद्द करणार! माकपच्या टीकेवर चिदम्बरम यांचा खुलासा
२०२३ हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंदवले गेले आहे. अनेक ठिकाणी विक्रमी तापमान नोंदवले गेले तसेच चक्रीवादळांमुळे अतिमुसळधार पावसाच्या घटनाही आधी वर्तवलेल्या अंदाजानुसार घडल्याचे ‘अॅडव्हान्सेस इन अॅटमॉस्फेरिक सायन्स’च्या अभ्यास अहवालात नमूद करण्यात आले आहे. याबरोबरच टोकाच्या घटना घडण्याच्या हंगामातील बदलाचेही संशोधकांनी निरीक्षण केले आहे. ब्रिटनच्या हवामान विभागातील अभ्यासक रॉबिन क्लार्क यांनी सांगितले आहे की, ‘‘आपल्याला विशिष्ट ऋतूंमध्ये ज्या घटना होण्याची शक्यता कमी असते त्याही घडत आहेत. उदाहरणार्थ, २०२३च्या वसंत ऋतूमध्ये नैऋत्य युरोप, ब्राझील, मोरोक्को आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये उष्णतेच्या लाटा आल्या.’’ क्लार्क हे या अभ्यासाचे सहलेखक आहेत.