बेशिस्तीचा ठपका ठेवून बसपाने २०१७च्या विधानसभा निवडणुकीसाठी अत्रौली मतदारसंघातून जाहीर केलेली संगीता चौधरी यांची उमेदवारी रद्द केली आहे.
पक्षाच्या नेत्या मायावती यांच्यासमोर वाकून त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार करीत असतानाची स्वत:ची आणि मुलांची छायाचित्रे चौधरी यांनी फेसबुकवर टाकल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
बेशिस्तीच्या कारणावरून संगीता चौधरी यांची उमेदवारी रद्द करण्यात आल्याचे बसपाचे जिल्हा अध्यक्ष अरविंद आदित्य यांनी सांगितले. मात्र आदित्य यांनी याबाबत कोणताही सविस्तर तपशील दिला नाही. यापूर्वी संगीता यांचा पती धर्मेद्र यांना अत्रौलीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र जानेवारी २०१५ मध्ये त्यांची हत्या करण्यात आली. आपल्याविरुद्ध कारवाई करण्यात आल्याने संगीता चौधरी व्यथित झाल्या आहेत. मायावती यांना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता, असे त्यांनी म्हटले आहे.