स्वातंत्र्यापूर्वी संस्थानिक असलेल्या डय़ुमराव या राजघराण्यातील सदस्यांनी प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी पुढे केलेला मैत्रीचा हात स्वीकारायची तयारी दर्शवली आहे. मात्र आपल्या ‘हाफ गर्लफ्रेंड’ या कादंबरीत या राजघराण्याविषयी जे अवमानकारक उद्गार चेतन भगत यांनी काढले आहेत, त्याबद्दल त्यांनी आमची बिनशर्त माफी जाहीरपणे मागावी आणि त्या पुस्तकाच्या अद्याप विकल्या न गेलेल्या प्रती त्यांनी बाजारातून मागे घ्याव्यात, अशी अट डय़ुमराव राजघराण्यातील सदस्यांनी घातली आहे.
बिहारमधील बक्सार जिल्ह्य़ात डय़ुमराव संस्थान आहे. पूर्वी महाराज बहादूर कमाल सिंग हे या संस्थानाचे संस्थानिक होते. चेतन भगत यांच्या ‘हाफ गर्लफ्रेंड’ या कादंबरीत डय़ुमराव येथील एक राजघराणे असा उल्लेख आहे. तसेच या घराण्यातील सदस्य जुगार आणि मद्यपान करणारे असल्याचे चित्र कादंबरीत रंगवण्यात आले आहे. याच अनुषंगाने, नोव्हेंबर महिन्यात चेतन भगत यांना कायदेशीर नोटीस धाडण्यात आली होती. त्यावर ‘माझ्या कादंबरीतील उल्लेख आपल्या घराण्याशी संबंधित नाही’, असा खुलासा भगत यांनी केला होता. मात्र डय़ुमराव येथे केवळ एकच राजघराणे आहे आणि लोक आम्हाला ओळखतात. भगत यांच्या लेखनामुळे आमची प्रतिमा मलिन झाली आहे, असे आरोप या राजघराण्याचे ६७ वर्षीय वारस युवराज चंद्रविजय सिंग यांनी केले.
आपल्या नोटिशीला उत्तर देण्यापूर्वीच चेतन भगत यांनी ट्विटरवर अत्यंत अवमानकारक वक्तव्य केले होते, ज्यामध्ये ‘डय़ुमराव येथील राजघराण्यातील लोकांना काल्पनिक कथा या संकल्पनेचा अर्थ समजाविण्याची गरज आहे आणि अत्यंत खासगीपणे मी ते करेन’, असे विधान करण्यात आले होते, असेही युवराज चंद्रविजय सिंग यांनी नमूद केले.

Story img Loader