“माझ्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल”, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भारत मंडपम उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. आगामी निवडणुकीतही पंतप्रधान पदाची उमेदवारी नरेंद्र मोदी यांनाच मिळणार असल्याचे हे सूतोवाच आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी टीका केली आहे.
हेही वाचा >> “माझ्या तिसऱ्या कार्यकाळात…”, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ गॅरंटी
नरेंद्र मोदी काय म्हणाले होते?
“२०१४ ला जेव्हा जनतेने आमच्या हाती (भाजपा) देशाचा कारभार दिला तेव्हा देशाची अर्थव्यवस्था दहाव्या क्रमाकांवर होती. आमच्या दुसऱ्या कार्यकाळात भारत हा देश जगातला पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश आहे. मी आता हे ट्रॅक रेकॉर्डच्या आधारे सांगतो आहे फक्त गप्पा म्हणून नाही. मी हे आत्मविश्वासाने सांगू इच्छितो की आमच्या तिसऱ्या कार्यकाळात जगातल्या तीन मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये भारताचं नाव असेल. ही मोदीची गॅरँटी आहे. माझ्या तिसऱ्या कार्यकाळात जनता त्यांची स्वप्नं त्यांच्या डोळ्यासमोर पूर्ण होताना पाहू शकेल. तसंच आमच्या तिसऱ्या कार्यकाळात देशाचा विकासरथ हा अधिक वेगाने धावेल”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
अरविंद सावंत यांची टीका काय?
“याला अतिआत्मविश्वास म्हणतात. याचा अर्थ INDIA ही जी आघाडी बनतेय, त्याचा तीर व्यवस्थित जागेवर लागला आहे. एकबाजूला म्हणतात की ते लोकशाहीला मानतात, घराणेशाहीच्या विरोधात असल्याचं ते सांगतात. तर दुसरीकडे ते पक्षाचे अध्यक्ष नसतानाही पंतप्रधान पदाचे तेच उमेदवार असल्याचं जाहीर करतात. मग तुमच्या पक्षाची लोकशाही काय आहे हेही सांगा”, असं अरविंद सावंत म्हणाले.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून चाचपणी सुरू झाली आहे. विविध राज्यात पक्षबांधणीला जोर आला आहे. समान नागरी कायद्यासह अनेक धोरणांचा नारा देण्यात आला आहे. सध्या जागतिक अर्थव्यवस्थेत भारत पाचव्या स्थानावर आहे. परंतु, भाजपाच्या पुढच्या टर्ममध्ये भारत जागतिक अर्थव्यवस्थेत तिसऱ्या क्रमांकावर जाईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे. तसंच, आगामी निवडणुकीत तेच पंतप्रधान पदासाठी उमेदवार असतील असे सूतोवाचही त्यांनी दिले आहे.