दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. यावरून राजधानीतील राजकारणही तापू लागले आहे. रविवारी छत्रपूर येथील दिल्ली जल बोर्डाच्या कार्यालयात अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या व्हिडीओमध्ये दिल्ली जल बोर्डाच्या कार्यालयात तोडफोड झाल्याचे दिसत आहे. तर आम आदमी पक्षानेही एक व्हिडीओ प्रसारित केला आहे. ज्यामध्ये भाजपाचे कार्यकर्ते कार्यालयात तोडफोड करत आहेत, असा दावा त्यांनी केला. भाजपाचा गमछा गळ्यात असलेले कार्यकर्ते या व्हिडीओत दिसत आहेत.
‘आप’ने शेअर केलेल्या व्हिडीओत भाजपाचे चिन्ह असलेला गमछा घातलेला एक तरूण दिसत आहे. “हे पाहा, भाजपाचे कार्यकर्ते कशापद्धतीने दिल्ली जल बोर्डाच्या कार्यालयाची तोडफोड करत आहेत. तसेच भाजपा जिंदाबाद अशा घोषणा देत आहेत. एका बाजूला हरियाणातील भाजपा सरकार दिल्लीच्या हक्काचे पाणी सोडत नाही. तर दुसऱ्या बाजूला दिल्लीतील भाजपा कार्यकर्ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करत आहेत.
भाजपाचे नेते आणि माजी खासदार रमेश बिधुरी यांनी ‘आप’चे आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले, हे नैसर्गिक आहे. लोकांचा संताप अनावर झाला तर ते प्रतिक्रिया देणारच. मी तर भाजपाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन व्यक्त करतो की, त्यांनी जनतेचा उद्रेक थोपवून धरला. ही सरकारची आणि पर्यायाने जनतेची मालमत्ता आहे. सरकारी मालमत्तेचे नुकसान करून कुणालाच लाभ मिळणार नाही.
दिल्लीतल द्वारका जिल्ह्यात पाण्याच्या प्रश्नावरून तणाव निर्माण झाला आहे. सार्वजनिक नळाद्वारे मिळणाऱ्या पाण्यावरून काही लोकांचा वाद झाला, या वादातून हाणामारी झाल्यामुळे तीन लोक जखमी झाले आहेत. त्यांना इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिल्ली पोलिसांना पीसीआर वरून दोन फोन आल्याचे निश्चित करण्यात आले आहे. पाण्याच्या संघर्षाला कोणतेही जातीय वळण नाही, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.
दिल्लीच्या जलमंत्री आतिशी सिंह यांनी वाढता संघर्ष लक्षात घेऊन दिल्लीचे पोलीस आुयक्त संजय अरोरा यांना पत्र लिहून तोडफोडीपासून पाण्याच्या पाईपलाईनचे संरक्षण करण्यासाठी कर्मचारी तैनात करण्याची विनंती केली आहे. दक्षिण दिल्लीत पाण्याच्या पाईपलाईनला जाणीवपूर्वक नुकसान पोहोचवले जात आहे, त्यामुळे पाण्याची टंचाई आणखी वाढत आहे, असा आरोप त्यांनी केला.
ईशान्य दिल्लीचे भाजपा खासदार मनोज तिवारी यांनी आज दिल्लीत मटका फोड आंदोलन केले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “प्रत्येक वर्षी पाण्याचे संकट उद्भवते. आतिशी कुणाची फसवणूक करत आहेत. हे आळशी लोक असून त्यांच्याकडे कामाचे निश्चित धोरण नाही किंवा काम करण्याचा कोणताही हेतू नाही. त्यांना फक्त सरकारी खजिन्याची लूट करायची आहे. मला आतिशी यांना सांगायचे आहे की, खोटं बोलण्यालाही मर्यादा असतात. जनताच त्यांना आता धडा शिकवेल.”