Most Polluted Cities in the World : देशभर दिवाळीचा जल्लोष सुरू आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या भारतीयांकडूनही दिवाळी साजरी केली जातेय. एकीकडे देशात वायू प्रदूषणामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आल्याने सर्वोच्च न्यायालयाने मर्यादित स्वरुपात फटाके फोडण्याला परवानगी दिली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला झुगारत देशभर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यामुळे देशातील तीन शहरे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरे म्हणून गणली गेली आहेत. यामध्ये पहिल्या नंबरवर देशाची राजाधानी दिल्लीचा क्रमांक लागतो. स्वीस ग्रुप IQAir ने हा अहवाल दिला आहे.
सकाळी ११.५२ पर्यंत दिलेल्या आकडेवारीनुसार, दिल्लीत ४१२ हवा गुणवत्ता निर्देशांक होता. तर त्यापाठोपाठ लाहोर (पाकिस्तान), बघदाद (इराक), कराची (पाकिस्तान), कुवैत शहर (कुवैत), कोलकत्ता (भारत), ढाका (बांगलादेश), मुंबई (भारत), सराजेवो (बोसनिया), दोहा (कतार) आदी दहा शहरांचा क्रमांक लागतो.
कुठे किती AIQ?
- दिल्ली – ४१२
- लाहोर- २६२
- बघदाद – २०६
- कराची – १९७
- कुवैत – १६८
- कोलकत्ता – १६७
- ढाका – १५५
- मुंबई – १५४
- सरजेवो – १५३
- दोहा- १४९
- जकार्ता – १२६
- काठमांडू – ११५
- शेन्यांग (चीन)- ११३
- रियाध (सौदी अरेबिया) – १०७
- कम्फांळा (युगांडा) – ९९
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीची हवा बिघडत आहे. त्यापाठोपाठ मुंबईतही वायू प्रदूषणाने उच्चांक गाठला. प्रदूषण नियंत्रणासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. दिल्लीत कृत्रिम पाऊस पाडण्याचीही योजना आखली होती. दिवाळीपूर्वी प्रदूषणात घट नोंदवली होती. परंतु, शनिवार, रविवारी झालेल्या आतिषबाजीमुळे वायू प्रदूषणात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. दिल्लीसह मुंबईतही हवेचा गुणवत्ता निर्देशांक वाढला.
पर्यावरण आणि मानवी आरोग्याच्या संदर्भात दररोजच्या हवेच्या गुणवत्तेची नोंद करण्यासाठी वापरली जाणारे एक संख्यात्मक प्रमाण म्हणजे हवा गुणवत्ता निर्देशांक म्हणजेच Air Quality Index . ० ते ५० AIQ असलेल्या शहरात कोणतेही वायू प्रदूषण नसते. तर, ५१ ते १०० मध्यम धोकादायक तर, १०१ वरील सर्व AIQ धोकादायक मानला जातो. तुमच्या शहरातील हवा आरोग्यासाठी धोकादायक असल्यास हवेचा गुणवत्ता निर्देशांक १०१ वर असेल. यामुळे या शहरातील लोकांना फुफ्फुसासंबंधी, श्वसनासंबंधी आजार जडण्याची शक्यता असते. जागतिक आरोग्य संघटनेने AIQ निश्चित केलेले आहेत. लाइव्ह रँकिंगनुसार मेक्सिको सिटीला जगातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून १०० व्या स्थानावर घोषित करण्यात आले आहे.