वेगवेगळ्या देशांमध्ये किमान ५५० मुलांचा जैविक पिता बनलेल्या एका पुरुषाला आता स्पर्म डोनेट करण्यास डच न्यायालयाने बंदी घातली आहे. न्यायालयाने शुक्रवारी हा आदेश दिला आहे. स्पर्म डोनेट करणाऱ्या व्यक्तीने आतापर्यंत किती महिलांना गर्भवती होण्यासाठी स्पर्म डोनेट केले याची खोटी माहिती दिली, तसेच स्पर्म डोनेट करत दिशाभूल केल्याचाही काही भावी पालकांचा आरोप आहे.
हेग जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांनी स्पर्म डोनर आणि इतर पालकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फाउंडेशनच्या माध्यमातून गर्भधारणा करुन बाळाला जन्म देणाऱ्या एका आईच्या याचिकेवर स्थगिती देण्याचा आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयाचे याचिकाकर्त्या आईने स्वागत केले आहे.
या निर्णयावर त्या म्हणाल्या की, मला आशा आहे की, या निर्णयामुळे स्पर्म डोनेशवर बंदी येईल. आपल्याच नाही तर इतर देशांमध्येही ही बंदी लागू होईल. या अन्यायाविरुद्ध आपण आपल्या मुलांच्या खांद्याला खांदा लावून त्यांचे संरक्षण केले पाहिजे.
न्यायालयाने नमूद केले की, डच मार्गदर्शक तत्त्वांनुसार, स्पर्म डोनरला १२ मातांद्वारे जास्तीत जास्त २५ मुले जन्माला घालण्याची परवानगी आहे. पण जोनाथन जेकब मेजर स्पर्म डोनेशनच्या त्याच्या हिस्ट्रीबाबत संभाव्य पालकांशी खोटे बोलला. या प्रकरणी न्यायालयाने आपल्या लेखी निर्णयात म्हटले की, डच गोपनीयता मार्गदर्शक तत्त्वांनुसार, स्पर्म डोनरची ओळख जोनाथन एम. नावाने झाली आहे, ज्याने अनेक डच फर्टिलिटी क्लिनिक आणि एका डेन्मार्कच्या क्लिनिकला तसेच जाहिराती आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे त्याच्या संपर्कात आलेल्या इतर अनेकांना स्पर्म डोनेट केले आहेत.
या स्पर्म डोनरच्या वकिलाने सुनावणीदरम्यान न्यायालयाला सांगितले की, ज्या पालकांना गर्भधारणा करता येत नाही त्यांना जोनाथन एमला मदत करायची आहे. पण कोर्टाने यावर एका निवेदनात म्हटले आहे की, पालकांचे मन वळविण्यासाठी स्पर्म डोनर जाणूनबुजून खोटे बोलला. ४१ वर्षीय स्पर्म डोनर जोनाथन एम याने किमान १३ वेगवेगळ्या क्लिनिकमध्ये त्याचे स्पर्म डोनेट केले आहे, त्यांपैकी ११ नेदरलँड्समध्ये आहेत.
याचिकाकर्त्या महिलेने म्हटले आहे की, जर तिला माहीत असते की, स्पर्म डोनर आधीच ५०० पेक्षा जास्त मुलांचा पिता बनला आहे तर तिने त्याची निवड अजिबात केली नसती.
डोनरकाइंडच्या मते, स्पर्म डोनरने हॉलंड आणि परदेशात दहाहून अधिक क्लिनिकद्वारे त्यांचे स्पर्म डोनेट केले. यामुळे त्याला इतर संस्थांना स्पर्मदान केले आहे का? याची माहिती न्यायालयाला द्यावी लागेल. ही माहिती पूर्ण नसल्याचे निष्पन्न झाल्यास, त्याने उल्लेख न केलेल्या प्रत्येक स्पर्म क्लिनिकसठी त्याला २५,००० युरोचा दंड भरावा लागेल.