संतोष प्रधान
कर्नाटकचे काँग्रेससाठी वेगळे महत्त्व आहे. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे मूळ राज्य. पक्षाची सत्ता असलेले एकमेव मोठे राज्य. अशा कर्नाटकातून काँग्रसला चांगल्या यशाची अपेक्षा असणे स्वाभाविक. यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते वा मंत्र्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याची योजना होती. पण बंगळूरुतील ऐहिक सुखाचा त्याग करून कोणीही दिल्लीत जाण्यास तयार नव्हते. शेवटी मुलगा, मुलगी, जावई, सुनांचा पर्याय काढण्यात आला.
इंडिया आघाडीला सत्ता मिळालीच तर पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव पंतप्रधानपदासाठी घेतले जात आहे. दोन दशकांपूर्वी कर्नाटकातील २० खासदारांच्या जोरावर जनता दलाचे देवेगौडा पंतप्रधान झाले होते.
कर्नाटकात चांगले यश मिळावे यासाठी पक्षाचे मंत्री व ज्येष्ठ नेत्यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची योजना होती. पक्षांतर्गत विरोधकांना दिल्लीत पाठविण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासाठी ही सुवर्णसंधीच होती. आमच्या घरात उमेदवारी द्या, जागा निवडून आणतो, असा शब्द बहुतांशी मंत्र्यांनी दिला. यातूनच आठ मंत्र्यांच्या घरातच उमेदवारी वाटण्यात आली. कोलार मतदारसंघात आपल्या जावयाला उमेदवारी द्यावी म्हणून मंत्री मुनीयप्पा आडून बसले. त्यावरून काँग्रेसच्या पाच आमदारांनी थेट राजीनाम्याचा इशारा दिल्याने पर्याय म्हणून दुसऱ्यालाच उमेदवारी देण्यात आली. उमेदवारी वाटताना घराणेशाहीला प्राधान्य देण्यात आल्याने काँग्रेसच्या स्थानिक नेतेमंडळींमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. स्वत: खरगे यांनीच घराणेशाहीला प्राधान्य दिल्याने अन्य नेत्यांना आयतीच संधी मिळाली. खरगे यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी करण्यात आली होती. पण गेल्या निवडणुकीत गुलबर्गा या बालेकिल्ल्यात पराभव स्वीकारावा लागल्यानेच बहुधा खरगे यांनी राज्यसभाच पसंत केलेली दिसते. खरगे यांनी गुलबर्गा या मतदारसंघात राधाकृष्ण डोड्डामणी या आपल्या जावयालाच उमेदवारी दिली. राज्यसभेचे माजी उपाध्यक्ष रेहमान खान यांचे पुत्र, बंगळूरुच्या माजी महापौरांचे पुत्र अशा विविध घराणेशाहीतील नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसच्या या घराणेशाहीवर भाजपने टीका केली आहे. पण भाजपचे प्रदेशाध्यक्षच माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पुत्र आहेत.
हेही वाचा >>>लडाखमधील ‘सीमा मोर्चा’ रद्द; शांततापूर्ण निदर्शने सुरू ठेवण्याचा निर्धार
भाजपमध्येही नाराजीनाट्य
गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीतील पराभवातून भाजप अजूनही सावरलेली नाही. प्रदेशाध्यक्षपदी येडियुरप्पा यांच्या मुलाची निवड केल्याने पक्ष संघटनेवर त्यांचाच पगडा आहे. त्यातच भाजपने विद्यामान ९ खासदारांना उमेदवारी नाकारली आहे. भाजपने देवेगौडा यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाशी युती केली आहे. देवेगौडा यांच्या पक्षाला तीन जागा सोडण्यात आल्या आहेत. भाजपने माजी प्रदेशाध्यक्षांपासून ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी नाकारली आहे. देशाची घटना बदलण्याची भाषा करणारे किनारपट्टी भागातील उत्तर कन्नडा मतदारसंघाचे सहा वेळा प्रतिनिधित्व केलेल्या अनंतकुमार हेगडे यांना भाजपने उमेदवारी नाकारली आहे. येडियुरप्पा यांच्या निकटवर्तीय केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांना बंगळूरु उत्तर मतदारसंघातून उमेदवारी दिल्याने या मतदारसंघाचे खासदार व माजी मुख्यमंत्री सदानंद गौडा नाराज झाले आहेत.
विधानसभा निवडणुकीतील पराभवातून भाजपने देवेगौडा यांच्या पक्षाशी युती करून लिंगायत आणि वोकलिगा या दोन महत्त्वाच्या जातींमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधकांवर भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराला थारा देत असल्याबद्दल भाजपची सारी नेतेमंडळी आरोप करीत असतानाच खाणसम्राट गाला जनार्दन रेड्डी यांना भाजपमध्ये पुन्हा अलीकडेच प्रवेश देण्यात आला. सीबीआयने नऊ गुन्हे दाखल केलेले खाणसम्राट भाजपला अधिक जवळचे वाटले. बेल्लारी आणि आसपासच्या परिसरात रेड्डी बंधूचे साम्राज्य असल्यानेच भाजपने खाण सम्राटांचे सारे गुन्हे माफ केले.
हेही वाचा >>>सिसोदियांच्या सहभागाशिवाय गुन्हा अशक्य! दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी ‘ईडी’चा न्यायालयात दावा
कर्नाटक काँग्रेसच्या २८ उमेदवारांच्या उमेदवारांच्या यादीत आठ मंत्र्यांची मुले, अन्य काही नेत्यांच्या नातेवाईकांचा भरणा आहे. विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळालेल्या कर्नाटकातून अधिक जागा जिंकण्याची अपेक्षा आहे.
देवेगौडांचा कौंटुंबिक पक्ष
पक्षाचे अस्तित्व कायम राखण्यासाठी देवेगौडा यांच्या पक्षाने भाजपशी युती करीत तीन जागांवर समाधान मानले आहे. या तीनपैकी दोन जागांवर देवेगौडा यांचे पुत्र माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी व दुसऱ्या जागेवर नातू लढत आहेत. देवेगौडा यांचे जावई भाजपच्या चिन्हावर रिंगणात आहेत.
या मंत्र्यांचे नातेवाईक रिंगणात
● उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे बंधू , परिवहनमंत्री रामलिंगम रेड्डी यांची कन्या, समाजकल्याणमंत्री एच. सी. माधवअप्पा यांचे पुत्र
● महिला व बालकल्याणमंत्री लक्ष्मी हेब्बलकर यांचे पुत्र
● सार्वजनिक बांधकामंत्री सतीश जारकीहोळी यांची कन्या पणनमंत्री शिवानंद पाटील यांची कन्या, वनमंत्री ईश्वर खंदारे यांचे पुत्र, खाणमंत्री मल्लिकार्जुन यांची पत्नी