* बोस्टन स्फोटप्रकरणी एफबीआयचा कयास 
*  ३० मे पासून खटला
तीन बळी आणि २०० जखमींसह अमेरिकेमध्ये पुन्हा दहशतीची भीती पेरणारा बोस्टन मॅरेथॉनमधील कूकर स्फोट झोखर सारनेव्ह याने मोबाइलद्वारे केल्याचे एफबीआयने स्पष्ट केले. न्यायालयामध्ये आरोपपत्र सादर करताना चेचेन वंशाच्या १९ वर्षीय झोखर सारनेव्ह याने मोबाइलच्या साहाय्याने दोन स्फोट घडविल्याचे म्हटले आहे. १५ एप्रिल रोजी बोस्टन स्फोटाची दुर्घटना घडली त्या क्षणी निर्माण झालेल्या कोलाहलामध्ये हा संशयित अत्यंत शांत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेराने कैद केल्याचेही आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
जुने काय?
बोस्टन बॉम्बहल्ल्याच्या घटनेनंतर अठ्ठेचाळीस तासांच्या आत पोलिसांच्या पथकाने नजीकच्या वॉटरटाऊन शहरामध्ये शोधमोहीम चालविली. विविध सीसीटीव्ही कॅमेरा फूटेजद्वारे संशयित झोखर सारनेव्ह (१९) आणि त्याचा मोठा भाऊ तामरलेन सारनेव्ह (२६) यांना पकडण्यासाठी शुक्रवारी वॉटरटाऊन शहर धारेवर धरले. तामरलेनचा चकमकीत मृत्यू झाला, तर दिवसभराच्या मोहिमेनंतर झोखरला पकडण्यात यश आले. जखमी अवस्थेतील झोखरवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नवे काय?
एफबीआयने सारनेव्ह विरोधातील आरोपपत्र दाखल केले असून, मॅसेच्युसेट्स जिल्हा न्यायालयामध्ये ३० मे रोजी त्याच्यावर पहिला खटला चालविण्यात येणार आहे. मोठय़ा जनसमुदायाला मारण्यासाठी शस्त्रे वापरल्याप्रकरणी झोखरवर आरोप निश्चित झाले असून त्यात दोषी ठरल्यास झोखरला मृत्युदंडाची शिक्षा होऊ शकेल. सध्या झोखेरवर दाखल करण्यात आलेले आरोपपत्र हे सीसीटीव्ही कॅमेराद्वारे मिळणाऱ्या माहितीवरून दाखल झाले आहेत. जखमी अवस्थेतील झोखेरकडून त्याबाबत कसलीही माहिती उपलब्ध झालेली नाही.
एफबीआयचा अंदाज?
सीसीटीव्ही कॅमेरामध्ये टिपण्यात आलेल्या दृश्यांनुसार स्फोटाच्या तीस सेकंद आधी त्याने आपल्याजवळील मोबाइल काढून बोलत असल्याचे नाटक केले. सुमारे १८ सेकंद त्याने हे नाटक चालविले. ज्या वेळी त्याने आपल्या मोबाइलवरील संभाषणनाटय़ थांबविले, त्याच क्षणी पहिला स्फोट झाला, असे एफबीआयने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा