सध्या भारत-कॅनडामध्ये तणावपूर्ण स्थिती आहे. अशातच भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी कॅनडामधील संघटित गुन्हेगारी, फुटीरतावादी शक्ती, हिंसाचार आणि अतिरेकी यावर भाष्य केलं. तसेच राजकीय कारणांमुळे या सर्व गोष्टींवर त्यांनी चिंताही व्यक्त केली. ते न्यू यॉर्कमध्ये ‘परराष्ट्र संबंधावरील परिषदेत’ बोलत होते.
जयशंकर म्हणाले, “मागील काही वर्षात कॅनडात अनेक संघटित गुन्हे घडले. फुटीरतावादी शक्तींकडून संघटित गुन्हे आणि हिंसाचार झाला. हे सर्व एकमेकांमध्ये फार मिसळून गेलेलं आहे. त्यामुळेच आम्ही तपशील आणि माहितीवर बोलत आहोत.”
“भारताने मोठ्या संख्येने प्रत्यार्पणाची विनंती केली”
“भारत सरकारने कॅनडाला मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांची आणि तेथून बाहेर देशात गुन्हे करणाऱ्या नेत्यांची माहिती दिली आहे. भारताने मोठ्या संख्येने प्रत्यार्पणाची विनंती केली आहे,” असंही जयशंकर यांनी नमूद केलं.
हेही वाचा : ‘फाइव्ह आइज’ कराराअंतर्गत अमेरिकेकडूनच कॅनडाला निज्जर हत्येचे धागेदोरे? काय आहे हा करार?
“कॅनडात दहशतवाद्यांचे नेते”
यावेळी जयशंकर यांनी कॅनडात दहशतवाद्यांचे नेते असल्याचं स्पष्ट झालं आहे, असाही आरोप केला. त्यांनी कॅनडात भारतीय राजदूत आणि दुतावासावर होत असलेल्या हल्ल्यावरही चिंता व्यक्त केली. तसेच लोकशाही अशाचप्रकारे चालते असं म्हणून याचं समर्थनही केलं जात आहे, असा आरोप केला.