भारत आणि पाकिस्तान अशा दोन राष्ट्रांची निर्मिती झाल्यापासून द्विपक्षीय संबंध तणावपूर्ण राहिले आहेत. यामध्ये पाकिस्तानकडून दहशतवादाला दिला जाणारा छुपा वा उघड पाठिंबा हे सर्वात महत्त्वाचं कारण ठरलं आहे. भारतानंही यासंदर्भात सातत्याने वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर आक्रमक भूमिका मांडली आहे. देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नुकतीच संयुक्त राष्ट्राच्या संरक्षणविषयक सभेमध्येही पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादावर परखड भाष्य केलं होतं. त्याचे पडसाद भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावरही पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रियामधील एका वृत्तवाहिनीच्या अँकरने एका टॉक शोमध्ये पाकिस्तानबाबत विचारलेल्या एका प्रश्नामुळे एस. जयशंकर संतापले. त्यांनी त्यावरून न्यूज अँकरलाच विशिष्ट पद्धतीने सुनावलं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेमकं घडलं काय?
ऑस्ट्रियातील ORF या न्यूज चॅनलवर भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची मुलाखत घेतली जात होती. समोरील अँकरने जयशंकर यांच्या एका विधानाबाबत त्यांना प्रश्न विचारला.जयशंकर यांनी पाकिस्तानचा उल्लेख ‘दहशतवादाचा केंद्रबिंदू’ असा केल्याबाबत त्यांना विचारणा करण्यात आली. त्यावर जयशंकर यांनी उलट संबंधित न्यूज अँकरलाच सुनावलं.
“तुम्ही डिप्लोमॅट आहात याचा अर्थ तुम्ही खोटारडे असायला हवे असा होत नाही. मी त्यापेक्षाही कठोर शब्द वापरू शकलो असतो. विश्वास ठेवा, आमच्याबाबत जे काही घडत आलं आहे त्यावरून मला वाटतं ‘केंद्रबिंदू’ हा फारच डिप्लोमॅटिक शब्द आहे. कारण हा तो देश आहे, ज्यानं काही वर्षांपूर्वी भारताच्या संसदेवर हल्ला केला होता. ज्यानं मुंबईवर हल्ला केला होता. हॉटेल आणि परदेशी पर्यटकांवर हल्ले केले होते. सीमाभागात दररोज दहशतवादाची जाणीव होत आहे”, असं एस. जयशंकर यावेळी म्हणाले.
पाकिस्तानबाबत भारताची भूमिका…
दरम्यान, यावेळी “एक देश म्हणून पाकिस्तानबाबत हा प्रश्न विचारण्यात आला आहे” असं अँकरनं म्हणताच पुन्हा जयशंकर यांनी त्यावर ऐकवलं. “मला खात्री आहे की पाकिस्तानचं सरकार त्यांच्या सार्वभौम सीमांचं रक्षण करतं. पण जर तिथल्या शहरांमध्ये दिवसाढवळ्या दहशतवादी छावण्या चालत असतील, त्यांना अर्थसहाय्य होत असेल, तर तुम्ही खरंच मला ठामपणे हे सांगू शकता का की पाकिस्तान सरकारला याबाबत काहीही माहिती नाही? विशेषत: त्यांना लष्करी दर्षाचं प्रशिक्षण दिलेलं असताना? जेव्हा तुम्ही तत्वांची भाषा करता, तेव्हा मला पाकिस्तानमध्ये गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेल्या या प्रकाराविषयी युरोपमधून तीव्र निषेध ऐकायला का मिळत नाही?” असा सवाल जयशंकर यांनी उपस्थित केला.
चिंता कशाची? भारत-पाकिस्तान युद्धाची की…
यानंतर जगाला भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध होईल की नाही? याची चिंता करायला हवी का? असा प्रश्न अँकरनं उपस्थित केला असताना जयशंकर यांनी त्यावर सविस्तर भूमिका मांडली.”मला वाटतं की जगानं पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या दहशतवादाची काळजी करायला हवी. या गोष्टीकडे जग नेहमीच दुर्लक्ष करत आलेलं आहे. जगाला नेहमीच असं वाटलं आहे की ही समस्या त्यांची नाही. युद्धाची काळजी करणं म्हणजे दहशतवादाकडे डोळेझाक करून त्याच्या परिणामांविषयी आपण आधी काळजी करण्यासारखं आहे. पण मला मूळ दहशतवादाचीच चिंता वाटते”, असं जयशंकर म्हणाले.